खवळलेल्या इस्रायलचे हमासला घणाघाती प्रत्युत्तर, हमासची १५० ठिकाणे नष्ट केली

खवळलेल्या इस्रायलचे हमासला घणाघाती प्रत्युत्तर, हमासची १५० ठिकाणे नष्ट केली

जेरूसलेम – हमासने केलेल्या १८० रॉकेटस् व मॉर्टर्सच्या हल्ल्यानंतर खवळलेल्या इस्रायलने गाझापट्टीतील हमासच्या सुमारे १५० ठिकाणांवर घणाघाती हवाई हल्ले चढविले. यात ३ जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच हमासच्या या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी तातडीने ‘सिक्युरिटी कॅबिनेट’ची बैठक बोलावली. पुढच्या काळात हा संघर्ष शमण्याची शक्यता नाही, असे सांगून इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासवर अधिक कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

इस्रायल, प्रत्युत्तर, बेंजामिन नेत्यान्याहू, लष्करी तळ, हवाई दल, हल्ले, ww3, गाझापट्टी, संरक्षणमंत्री लिबरमन

गाझापट्टीतून इस्रायलवर होणारे हल्ले थांबले नाहीत, तर पुढील परिणामांना हमास जबाबदार असेल, असे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू व संरक्षणमंत्री लिबरमन यांनी आधीच बजावले होते. त्या पार्श्‍वभूमीवर बुधवारच्या रात्रीपासून सुरू झालेल्या रॉकेटस् व मॉर्टर्सच्या हल्ल्यावर इस्रायलकडून तितकीच जहाल प्रतिक्रिया उमटली. इस्रायलच्या हवाई दलाने गाझापट्टीतील हमासच्या सुमारे १५० ठिकाणांवर हल्ले चढविले असून यामध्ये रफाह शहरातील हमासच्या लष्करी तळाचाही समावेश आहे. त्याचबरोबर हमासच्या भुयारांनाही इस्रायलच्या हवाई दलाने लक्ष्य केले. इस्रायलच्या संरक्षणदलाने हमासवरील या हल्ल्यांची माहिती देणारे नकाशे प्रसिद्ध केले आहेत.

इस्रायलबरोबर दीर्घकालीन संघर्षाची तयारी करण्यासाठी हमासने गाझापट्टीत ठिकाठिकाणी भुयारे खणली असून या भुयारांवरील इस्रायलच्या हवाई दलाने चढविलेले हल्ले हमासचे फार मोठे नुकसान करणारे ठरू शकतात. मात्र इस्रायलने यावेळी चढविलेल्या हल्ल्यात हमासचे नक्की किती नुकसान झाले, याचे तपशील उघड झालेले नाहीत. पण हमासचे पाच प्रशिक्षण तळ आणि एक शस्त्रागार व खान युनूस भागातील हमासच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भेटीगाठींचे ठिकाण इस्रायलच्या हवाई हल्ल्यात नष्ट झाल्याचे वृत्त आहे.

या हल्ल्यांच्या बरोबरीने इस्रायलने देशांतर्गत सुरक्षा वाढविण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी संरक्षणमंत्री लिबरमन, संरक्षणदलप्रमुख गादी एस्केनॉद, अंतर्गत सुरक्षा यंत्रणा ‘शिन बेत’चे प्रमुख नदाव अर्गमन आणि ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रमुख ‘मीर बेन-शबात’ यांची बैठक बोलावली. या बैठकीत हमासच्या विरोधातील पुढील कारवायांवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. तसेच या बैठकीदरम्यान, पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इस्रायल व हमासमधील हा संघर्ष इतक्यात निवळण्याची शक्यता नाही, असा संदेश दिला आहे. यामुळे पुढच्या काळात इस्रायल हमासच्या विरोधात अधिक कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट झाले असून इस्रायली नेत्यांनी व अधिकार्‍यांनी याआधीच तसे स्पष्टपणे बजावले होते.

English हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info