मॉस्को – अमेरिकेत सध्या संपूर्ण व्यवस्था भयंकर समस्येला तोंड देत असून ही समस्या सोडविण्यासाठी महायुद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही. गेली दोन वर्षे हे युद्ध सुरू असून सातत्याने अधिकाधिक तीव्र होत आहे. मात्र हे युद्ध आण्विक नसून आर्थिक स्तरावर सुरू आहे आणि चीन-रशिया आघाडी अमेरिका-ब्रिटनविरोधात जिंकताना दिसत आहे, असा दावा अलेक्झांडर झॅपोल्किस या रशियन विश्लेषकांनी केला आहे. अमेरिकी अभ्यासगटाच्या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
अलेक्झांडर झॅपोल्किस यांनी एका रशियन वृत्तसंस्थेसाठी लिहिलेल्या लेखात, तिसरे महायुद्ध सुरू झाल्याचा उल्लेख केला आहे. झॅपोल्किस यांनी चीन व रशिया यांच्या आघाडीचा ‘युरेशिया’ असा उल्लेख करून अमेरिका व ब्रिटनला ‘ग्लोबल आयलंड’ असे संबोधले आहे. चीन नव्या जागतिक व्यवस्थेचे केंद्र बनला असून रशिया भविष्यातील जगाचे नवे ‘हब’ बनल्याचा दावा अलेक्झांडर झॅपोल्किस यांनी आपल्या लेखात केला.
व्यवस्था व विचारांच्या पातळीवर अमेरिकेत मोठी समस्या निर्माण झाली असून त्यामुळे त्यांचे आतापर्यंतचे जगावरील एकहाती वर्चस्व संपुष्टात येईल, असे रशियन विश्लेषकाने आपल्या लेखात म्हटले आहे. चीन व रशिया आघाडीने तयार झालेला ‘युरेशिया’ गट नव्या राजकीय व्यवस्थेला आकार देत असून लवकर जागतिक स्तरावरील मध्यवर्ती केंद्र म्हणून पुढे येईल, असा दावाही त्यांनी केला.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरील कर्ज तसेच आर्थिक तुटीचा उल्लेख करून नजिकच्या काळात अमेरिका जगाचा विश्वास गमावून बसेल, असे भाकित अलेक्झांडर झॅपोल्किस यांनी केले आहे. चीनच्या आर्थिक प्रगतीचा व वर्चस्वाबद्दल दावे करताना त्यांनी या देशाचा यापुढे दुसर्या जगातील देश म्हणून उल्लेख करणे चुकीचे ठरेल, असा इशाराही दिला. अमेरिकेने चीन, रशिया, युरोप तसेच इतर देशांविरोधात सुरू केलेल्या आर्थिक युद्धात अमेरिकाच पराभूत होईल, असा दावा करून त्यानंतर अमेरिका एकसंघ राहणार नाही व त्याची शकले उडतील, असा खळबळजनक दावाही केला.
अमेरिकेच्या पराभवाबद्दल दावे करणार्या अलेक्झांडर झॅपोल्किस यांनी अमेरिका पूर्णपणे कोसळणे इतरांच्या हिताचे ठरणार नाही, असेही बजावले आहे. कारण अमेरिकी डॉलरवर आधारित व्यवस्थेमुळे इतर देशांनाही फटका बसून मोठे संकट ओढवू शकते, अशी भीती रशियन विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |