दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका – जागतिक स्तरावरील उगवत्या अर्थव्यवस्था संकटाच्या छायेत

दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका – जागतिक स्तरावरील उगवत्या अर्थव्यवस्था संकटाच्या छायेत

जोहान्सबर्ग/वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय स्तरावरील उगवत्या अर्थव्यवस्थांपैकी एक असणार्‍या दक्षिण आफ्रिकेला मंदीचा जबरदस्त फटका बसला आहे. शेती, वाहतूक, रिटेल, दूरसंचार या क्षेत्रातील घसरणीमुळे सलग दुसर्‍या तिमाहीत दक्षिण आफ्रिकेच्या विकासदरात घट झाली असून सरकारने अर्थव्यवस्था मंदीत गेल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, युरोप व आशियातील शेअरबाजारांमध्येही जोरदार घसरण सुरू झाली असून चीन, रशिया, भारत, ब्राझिल, तुर्की, अर्जेंटिना, इंडोनेशिया यासारख्या उगवत्या अर्थव्यवस्था नव्या आर्थिक संकटाच्या छायेत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दक्षिण अफ्रिका, मंदी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रँड, चलन, घसरण, व्यापारयुद्ध, ww3, वॉशिंग्टन, चीन

मंगळवारी, दक्षिण आफ्रिका सरकारने अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी जाहीर केली. त्यात २०१८च्या सलग दुसर्‍या तिमाहीत अर्थव्यवस्थेची घसरण झाल्याची माहिती देण्यात आली असून अर्थव्यवस्थेत ०.७ टक्क्यांची घट झाल्याचे सांगण्यात आले. पहिल्या तिमाहीत दक्षिण आफ्रिकेची अर्थव्यवस्था २.६ टक्क्यांनी घसरली होती. सलग दुसर्‍या तिमाहीत अर्थव्यवस्थेत घसरण होण्याची २००९ सालच्या मंदीनंतरची ही पहिलीच वेळ आहे. २०१४ ते २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेत, दरवर्षी एका तिमाहीत विकासदरात घसरण दिसून आली होती. मात्र यावर्षी सलग दुसर्‍या तिमाहीत झालेल्या घसरणीने दक्षिण आफ्रिका सरकारला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येते.

दक्षिण आफ्रिकेतील मंदीच्या घोषणेनंतर ‘रँड’ या चलनात अवघ्या २४ तासात दीड टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. गेले काही महिने ‘रँड’च्या दरात सातत्याने घसरण होत असून आठ महिन्यांच्या कालावधीत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ‘रँड’ २० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. यामागे अमेरिकी डॉलरच्या मजबुतीबरोबरच इतर आघाडीच्या चलनांमध्ये होणारी घसरण व दक्षिण आफ्रिका सरकारने जमिन सुधारणांबाबत घेतलेला निर्णय हा गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.

दक्षिण अफ्रिका, मंदी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रँड, चलन, घसरण, व्यापारयुद्ध, ww3, वॉशिंग्टन, चीन

दक्षिण आफ्रिकेला मंदीचा फटका बसत असतानाच जगातील इतर उगवत्या अर्थव्यवस्थाही संकटाच्या छायेत असल्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकी डॉलर अधिकाधिक मजबूत होत असल्याचे संकेत अमेरिकी प्रशासनाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीतून मिळत आहेत. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन व युरोपविरोधात सुरू केलेल्या व्यापारयुद्धाचे फटके इतर देशांना बसू लागल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर रशिया व तुर्कीसारख्या देशांवर लादलेल्या निर्बंधांचेही परिणाम दिसू लागले आहेत.

गेल्या काही दिवसात रशिया, भारत, ब्राझिल, तुर्की, अर्जेंटिना, इंडोनेशिया या देशांच्या चलनांमध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरण होत आहे. या देशांसह जगातील उगवत्या अर्थव्यवस्थांमध्ये सामील असणार्‍या आग्नेय आशियाई देशांकडे जवळपास साडेतीन लाख कोटी डॉलर्सहून अधिक अमेरिकी कर्जरोखे आहेत. या देशांच्या चलनांमध्ये होणारी घसरण आणि अमेरिकी डॉलरच्या मजबुतीमुळे या देशांच्या अर्थव्यवस्थांना बसणार्‍या फटक्याची तीव्रता वाढत चालली आहे.

मंगळवार तसेच बुधवारी युरोप तसेच आशियाई देशांच्या शेअरबाजारांमध्ये मोठी पडझड दिसून आली. इंडोनेशियातील शेअरबाजार चार टक्क्यांनी तर चीनमधील शेअरनिर्देशांक दोन टक्क्यांनी घसरला आहे. मंगळवारी लंडन तसेच युरोपातील शेअरबाजारांचे निर्देशांकही पडल्याची माहिती समोर आली आहे. चलनांमधील घसरण, दक्षिण आफ्रिकेतील मंदी व शेअरबाजारातील पडझड या सर्वांचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसू शकतो, अशी भीती विश्‍लेषकांकडून व्यक्त होत आहे.

English  हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info