दमास्कस – सोमवारी रात्री सिरियाच्या लताकिया प्रांतावर इस्रायलने चढविलेल्या हवाई हल्ल्याचे भयंकर परिणाम समोर आले आहेत. इस्रायलच्या लढाऊ विमानावर सिरियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने क्षेपणास्त्रांचा मारा केला व त्यात हे विमान पडण्याऐवजी रशियाचे लष्करी विमान कोसळले. हे विमान नक्की कुणी पाडले, याबाबत सुरूवातीच्या काळात वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या आणि यामुळे इथला तणाव प्रचंड प्रमाणात वाढला. मात्र हे विमान सिरियन हवाई सुरक्षा यंत्रणेने चुकून पाडले असले तरी यासाठी रशियाने इस्रायललाच जबाबदार धरले आहे. याला उत्तर देण्याचा अधिकार आपण राखून ठेवल्याचा सूचक इशारा रशियाने दिला आहे.
सिरियाच्या लताकिया प्रांतावर सोमवारी रात्री इस्रायली वायुसेनेच्या ‘एफ-१६’ लढाऊ विमानाने घणाघाती हल्ला चढविला. लताकिया प्रांतात रशियन नौदलाचा तसेच वायुसेनेचाही तळ आहे. त्याचबरोबर रशियाने सिरियाला पुरविलेली ‘एस-४००’ ही हवाई सुरक्षा यंत्रणादेखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. यामुळे आत्तापर्यंत इस्रायलने या भागात हवाई हल्ले चढविले नव्हते. मात्र सोमवारच्या रात्री इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लताकियावर घणाघाती हल्ले चढविले असून यात १० जण जखमी झाल्याचे सांगितले जाते. यातील दोघेजण गंभीर स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.
इस्रायलकडून सिरियावर सातत्याने हल्ले होत असून त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी सिरियाकडून दिली जाते. मात्र सोमवारच्या रात्री हल्ला चढविणारे इस्रायलचे लढाऊ विमान लक्ष्य करताना सिरियाच्या यंत्रणांनी ‘एस-२००’ या रशियन बनावटीच्या हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर केला. या यंत्रणेद्वारे सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या ‘एफ-१६’ विमानाचा वेध घेण्याऐवजी चुकून रशियाच्या टेहळणी विमानालाच लक्ष्य केले. सुरुवातीच्या काळात इस्रायलच्या हल्ल्यानंतर रशियाचे हे विमान रडारवरून गायब झाल्याचा दावा केला जात होता. तर फ्रान्सने आपले विमान पाडल्याचे आरोप रशियाकडून केले जात होते.
भूमध्य सागरी क्षेत्रात तैनात असलेल्या फ्रान्सच्या विनाशिकेने लताकियावर हल्ला चढविला आणि या हल्ल्यात आपले विमान पडल्याचे रशियाने म्हटले होते व त्यावर तीव्र संताप व्यक्त केला होता. पण कालांतराने हे विमान सिरियाच्याच हवाई सुरक्षा यंत्रणेने पाडल्याचे उघड झाले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही ही बाब मान्य केली. मात्र असे असले तरी इस्रायलच्या बेजबाबदारपणामुळेच आपले विमान पडल्याचा ठपका रशियाने ठेवला आहे. इस्रायलने जाणीवपूर्वक हा हल्ला चढवून रशियाचे विमान आपल्यावर होणार्या प्रतिहल्ल्याच्या कचाट्यात येईल, अशी परिस्थिती निर्माण केली होती, असा आरोप रशियन संरक्षणमंत्रालयाचे प्रवक्ते ‘मेजर जनरल इगोर कोनाशेंकोव्ह’ यांनी केला आहे.
रशियाचे विमान या ठिकाणी उतरत आहे, हे ठाऊक असूनही इस्रायलने हा हल्ला चढविला होता. तसेच हा हल्ला चढविण्याच्या अवघ्या एक मिनिट आधी इस्रायलने रशियाला याची कल्पना दिली होती. त्यामुळे रशियन यंत्रणा आपल्या विमानाला वाचविण्यासाठी काहीही करू शकली नाही, असा ठपका मेजर जनरल कोनाशेंकोव्ह यांनी ठेवला. इस्रायलच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार रशिया आपल्याकडे राखून ठेवत आहे, असे रशियन लष्कराने बजावले आहे. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ही घटना पुढे सुरू होणार्या अनेक दुर्दैवी घटनांची मालिका सुरू करणारी ठरेल, असे सूचक उद्गार काढले आहेत.
हे विमान भूमध्य सागरी क्षेत्रात कोसळले असून अद्याप त्याचा सुगावा लागलेला नसल्याची माहिती रशियन संरक्षणमंत्रालयाने दिली. सोमवारी रात्री पडलेल्या रशियन विमानाच्या घटनेची तुलना तुर्कीने २०१५ साली पडलेल्या रशियन विमानाच्या घटनेशी करता येणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |