वॉशिंग्टन – चीनकडे ‘साऊथ चायना सी’वर नियंत्रण मिळविण्याची पूर्ण क्षमता असून ते रोखण्यासाठी युद्ध हाच एकमेव पर्याय अमेरिकेसमोर आहे, असा इशारा अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक कमांड’ चे प्रमुख ऍडमिरल फिलिप डेव्हिडसन यांनी दिला. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे वरिष्ठ नौदल अधिकारी ऍडमिरल हॅरी हॅरिस यांनीही अशाच स्वरुपाच इशारा देऊन चीनच्या ‘साऊथ चायना सी’मधील हालचालींकडे केलेले दुर्लक्ष अमेरिकेला महागात पडेल, असे बजावले होते.
अमेरिकी संसदेच्या ‘सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’समोर झालेल्या सुनावणीत ऍडमिरल डेव्हिडसन यांनी आपल्या आधीच्या अधिकार्यांनी दिलेल्या इशार्याचा पुनरुच्चार केला. अमेरिकेचा संरक्षण विभाग ‘पेंटॅगॉन’ने गेल्याच महिन्यात प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातही चीनच्या ‘साऊथ चायना सी’मधील वाढत्या धोक्याचा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर ऍडमिरल डेव्हिडसन यांचे संसदीय सुनावणीमधील वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.
अमेरिकेने ‘इंडो-पॅसिफिक कमांड’ची स्थापना करून पॅसिफिक क्षेत्रात आपला प्रभाव पुन्हा एकदा वाढविण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या या हालचाली चीनच्या ‘साऊथ चायना सी’मधील आक्रमकतेला उद्देशून असल्याचेच सांगण्यात येते. दोन आठवड्यांपूर्वी, ‘साऊथ चायना सी’मध्ये अमेरिकी नौदल व जपानी नौदलाचा संयुक्त युद्धसराव पार पडला होता. त्यापूर्वी अमेरिकेच्या प्रगत ‘बी-५२’ बॉम्बर्स विमानांनी चीनच्या ‘साऊथ चायना सी’मध्ये गस्त घातली होती.
अमेरिकेकडून चीनला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच चीननेही अमेरिकेसह इतर देशांना या भागापासून दूर राखण्यासाठी आक्रमक धोरण आखले आहे. चीनचे ब्रिटनमधील राजदूत लिऊ शिओमिंग यांनी, ‘साऊथ चायना सी’मधील पाश्चात्य देशांच्या हालचाली खपवून घेतल्या जाणार नसल्याचे बजावले आहे. ‘काही मोठे देश फ्रिडम ऑफ नेव्हिगेशनचा आधार घेऊन चीनच्या सागरी हद्दीनजिक युद्धनौका व लढाऊ विमाने पाठवित आहेत. हा चीनच्या सार्वभौमत्त्वाचा भंग आहे. आपले हितसंबंध व सार्वभौमत्त्वाच्या सुरक्षेच्या मुद्यावर कोणीही चीनला कमी लेखण्याची चूक करू नये’, असा खरमरीत इशारा शिओमिंग यांनी दिला.
काही दिवसांपूर्वीच, ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रात ब्रिटनची युद्धनौका ‘एचएमएस अल्बियॉन’ आणि चीनचे नौदल एकमेकांसमोर खडे ठाकल्याची माहिती समोर आली होती. त्यापूर्वी अमेरिका, फ्रान्स व जपानच्या युद्धनौकांनीही ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रातून प्रवास करीत चीनला आव्हान दिले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |