रशियाचा प्रभाव टाळण्यासाठी पोलंडकडून ‘बाल्टिक सी कॅनल’चा प्रस्ताव

रशियाचा प्रभाव टाळण्यासाठी पोलंडकडून ‘बाल्टिक सी कॅनल’चा प्रस्ताव

वॉर्सा – ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोलंडचे स्थान लक्षात घेता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. दुसर्‍या देशावर अवलंबून राहणारा देश म्हणून असलेली पोलंडची ओळख पुसणे गरजेचे आहे. पोलंडने काय करावे आणि काय नाही, याचा निर्णय रशियाने घेण्याचे दिवस आता संपले आहेत, हे दाखवून द्यायलाच हवे’, अशा शब्दात पोलंडच्या सत्ताधारी पक्षाचे प्रमुख ‘जॅरोस्लाव कॅझिन्स्की’ यांनी ‘बाल्टिक सी’ क्षेत्रात नवा कालवा उभारण्याची घोषणा केली. सध्या पोलंडच्या ‘एल्ब्लॅग’ बंदरातील जहाजांना प्रवासासाठी रशियाच्या ‘कॅलिनिनग्रॅड’चा भाग असणार्‍या सागरी क्षेत्राचा वापर करावा लागतो.

बाल्टिक सी कॅनल, प्रस्ताव, जॅरोस्लाव कॅझिन्स्की, कालवा, संरक्षणसज्ज, रशिया, world war 3, पोलंड, अमेरिकाबाल्टिक सी क्षेत्रातील सर्वात मोठा युरोपिय देश म्हणून ओळखण्यात येणारा पोलंड रशियाचा सर्वात मोठा विरोधक आहे. रशियाच्या ‘कॅलिनिनग्रॅड’ या संरक्षणतळाला जोडून असल्याने पोलंडला सातत्याने रशियाकडून आक्रमणाची भीती असल्याचे पोलिश राजवटीकडून करण्यात येतात. युक्रेनमधील रशियाच्या कारवाईनंतर पोलंडला वाटणारी ही भीती अधिकच वाढली असून नाटो व अमेरिकेने पोलंडला संरक्षणसज्ज करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पोलंडने अमेरिकेबरोबर ‘पॅट्रिऑट’ क्षेपणास्त्रयंत्रणेच्या तैनातीसाठी करार केला असून नाटोचा तळही कार्यरत झाला आहे.

पोलंडच्या सत्ताधारी राजवटीने सातत्याने रशियाविरोधी भूमिका घेतली असून रशियावर इंधनासाठी अवलंबून राहू नये यासाठी २०१५ साली नव्या इंधनप्रकल्पाची उभारणी केली होती. रशियाकडून बाल्टिक सी क्षेत्रातून जर्मनीला इंधनपुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणार्‍या ‘नॉर्ड स्ट्रीम २’ या प्रकल्पालाही पोलंडने जोरदार विरोध केला आहे. त्यानंतर आता पोलंडने देशात अमेरिकेचा कायमस्वरुपी संरक्षणतळ उभारण्यासाठीही हालचाली सुरू केल्याचे समोर येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, पोलंडच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांनी ‘बाल्टिक सी कॅनल’च्या प्रकल्पाला गती देण्याबाबत केलेले वक्तव्य रशियाविरोधी भूमिकेला दुजोरा देणारे ठरते. पोलंड सरकारने २०१७ साली ‘बाल्टिक सी कॅनल’ बाबत प्रस्ताव पुढे आणला होता. त्यानुसार, पोलंडच्या ‘एल्ब्लॅग’ बंदरातील जहाजांच्या प्रवासासाठी ‘विस्तुला लगून’ भागात एक कालवा खोदण्यात येणार आहे. हा कालवा ११०० यार्ड लांब व १६ फूट खोल असणार आहे. या वर्षाच्या अखेरपासून कालव्याचे काम सुरू होणार असून त्यासाठी २५ कोटी डॉलर्स खर्च करण्यात येणार आहे.

रशियाने या महिन्याच्या सुरुवातीला युरोपिय कमिशनला पत्र लिहून सदर प्रकल्पाला विरोध असल्याची माहिती दिली आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती रशियाच्या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. पोलंड सरकारने रशियाचे पत्र म्हणजे पोलंडमध्ये होणारी गुंतवणूक रोखण्याचा प्रयत्न, अशा शब्दात त्यावर टीकास्त्र सोडले आहे. रशियाच्या या पत्रानंतर पोलंड सरकारचा कालवा उभारण्याचा निर्धार अधिकच ठाम झाला असल्याचे ‘जॅरोस्लाव कॅझिन्स्की’ यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.

English  हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info