अराजकसदृश परिस्थितीत जर्मनीतील प्रमुख राजकीय नेत्यांची हत्या घडविण्याचा कट उघड

अराजकसदृश परिस्थितीत जर्मनीतील प्रमुख राजकीय नेत्यांची हत्या घडविण्याचा कट उघड

बर्लिन – जर्मनीत सत्ताधारी राजवट कोसळल्यानंतर नागरी व्यवस्था कोलमडल्यास, त्याचा फायदा उचलून प्रमुख राजकीय नेत्यांची हत्या घडविण्याचा धक्कादायक कट उघड झाला आहे. कट्टर उजव्या विचारसरणीचा भाग असलेल्या एका भूमिगत ‘नेटवर्क’द्वारे हा कट आखण्यात आल्याचे समोर आले असून त्यात जर्मन लष्करातील कमांडो तसेच माजी अधिकार्‍यांचा सहभाग असल्याचाही दावा करण्यात येत आहे. ‘फोकस’ या जर्मन साप्ताहिकाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

जर्मन पोलिसांनी उघडकीस आणलेल्या कटात ‘डे एक्स’ या दिवसाचा उल्लेख करण्यात आला आहे. जर्मनीतील सरकार पडल्यानंतर देशभरात नागरी अराजकता निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली असून त्या दिवसाचा उल्लेख ‘डे एक्स’ असा करण्यात आला आहे. देशातील अराजकाचा फायदा उचलून प्रमुख राजकीय नेत्यांचे अपहरण कारण्याचा आणि त्यांना गुप्त स्थानी नेऊन सामूहिक हत्या घडविण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती जर्मन साप्ताहिकाने दिली.

या कटाचे ठोस पुरावे जर्मन यंत्रणांना मिळाले असून प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये ‘लेफ्ट पार्टी’चे नेते ‘डेटमॅर बार्श’ यांचा उल्लेख आहे. कटाची आखणी कट्टर उजव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या विविध गटांमधून एकत्र आलेल्या एका भूमिगत ‘नेटवर्क’कडून झाल्याचे सांगण्यात येते. मात्र या नेटवर्कचे नाव खुले करण्यात आलेले नाही. या भूमिगत नेटवर्कमध्ये जर्मन लष्करातील कमांडोंच्या ‘केएसके’ नावाने ओळखण्यात येणार्‍या ‘स्पेशल ऑपरेशन्स युनिट’मधील सदस्यांचा समावेश खळबळ उडविणारा ठरला आहे.

सध्या युनिटमध्ये सक्रिय असलेल्या कमांडोंबरोबरच लष्कर तसेच इतर सुरक्षायंत्रणांमधील माजी अधिकारीही नेटवर्कचा भाग असल्याचे आढळले आहे. या ‘नेटवर्क’ने मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जमविला असून त्याचे स्वतंत्र कोठार तसेच इंधनाचा मोठा साठा असलेल्या जागाही तयार केल्या आहेत. जर्मनीतील ‘मिलिटरी इंटेलिजन्स’साठी माहितीचा गुप्त स्रोत बनलेल्या एका अधिकार्‍याने या नेटवर्कची माहिती दिली असल्याचा दावा साप्ताहिकातील लेखात करण्यात आला आहे.

जर्मनीत गेल्या काही वर्षात उजव्या गटांचा प्रभाव वाढत असल्याचे समोर येत आहे. जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी निर्वासितांसाठी जाहीर केलेल्या धोरणानंतर जर्मन नागरिकांचा कल उजव्या गटांच्या दिशेने वाढल्याची माहितीही प्रसिद्ध झाली आहे. या उजव्या गटांबरोबरच दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील जर्मन हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्या ‘नाझी’ विचारसरणीवर विश्‍वास ठेवणार्‍या नागरिकांची संख्याही वाढत असल्याचे उघडकीस आले आहे.

राजकीय तसेच सामाजिक पातळीवर उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी जर्मनीतील प्रस्थापित राजकीय पक्षांना जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या निवडणुकांचे निकाल तसेच निर्वासितांच्या मुद्यावरून होणार्‍या निदर्शनांना मिळणारा वाढता प्रतिसाद यातून ही बाब अधोरेखित झाली आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांकडून जर्मन नागरिकांना पुन्हा आपल्या बाजूला वळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

या पार्श्‍वभूमीवर उजव्या विचारसरणीशी निगडीत गटांचे नाव देशविरोधी व अराजकतावादी कटाशी जोडले जाण्याचे वृत्त लक्ष वेधून घेणारे ठरते.

जर्मन नेत्यांच्या हत्येचा कट म्हणजे निर्वासितधार्जिण्या धोरणांवर आलेली प्रतिक्रिया

जर्मनीतील प्रखर राष्ट्रवादी, उजव्या विचारसरणीचे गट, सध्याच्या चॅन्सेलर मर्केल यांनी स्वीकारलेल्या धोरणांमुळे भडकले आहेत. त्यांना जर्मनीच्या जनतेकडून प्रतिसादही मिळू लागला आहे. जर्मनीत शिरलेल्या परधर्मिय निर्वासितांमुळे या देशाची मूळ संस्कृती व ओळखच पुसण्याची भीती निर्माण झाल्याने, निर्वासितांच्या विरोधात जहाल भूमिका घेणार्‍यांच्या मागे जर्मनीची जनता उभी रहिली आहे. काही दिवसांपूर्वी जर्मनीत पार पडलेल्या निवडणुकीतही याचे पडसाद उमटले होते.

अशा परिस्थितीत प्रमुख जर्मन नेत्यांच्या हत्येचा कट व त्यामागे उजव्या गटाशी संबंधित असलेल्या अधिकार्‍यांचा हात, यामागे जर्मनीत खदखदत असलेला असंतोष असल्याचे दिसते आहे. पुढच्या काळात निर्वासितांची समस्या व कट्टरपंथीयांचा हिंसाचार रोखण्यात जर्मन सरकार व राजकीय पक्षांना अपयश आले, तर त्याचे फार मोठे पडसाद या देशात उमटतील, हे जर्मनीत उघड झालेल्या या कटाद्वारे स्पष्ट होत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info