हमासकडून इस्रायलवर घणाघाती रॉकेट हल्ले – भीषण हवाई हल्ल्यांद्वारे इस्रायलचे प्रत्युत्तर

हमासकडून इस्रायलवर घणाघाती रॉकेट हल्ले – भीषण हवाई हल्ल्यांद्वारे इस्रायलचे प्रत्युत्तर

जेरूसलेम/गाझा – सोमवारच्या रात्री हमासने इस्रायलच्या सीमाभागात 300 हून अधिक रॉकेट, मॉर्टर्स व क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवून इस्रायलला आव्हान दिले. या हल्ल्यांमध्ये 16 जण जखमी झाले आहेत. यानंतर खवळलेल्या इस्रायलच्या लष्कराने गाझापट्टीतील हमासच्या 60 ठिकाणांवर घणाघाती हवाई हल्ले चढविले आहेत. हमासचे टीव्ही चॅनल अल-अक्सा देखील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात बेचिराख झाले. या हवाई हल्ल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीच्या सीमेवर रणगाडे, तोफांची तैनाती वाढविली असून इस्रायली लष्कर मोठ्या हल्ल्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी इस्रायलच्या ‘स्पेशल फोर्सेस’च्या जवानांनी गाझापट्टीत घुसून हमासच्या वरिष्ठ कमांडरसह सात जणांना ठार केले होते. इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोका ठरणार्‍या हमासच्या कमांडरला संपविण्यासाठी ही कारवाई केल्याचे इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी जाहीर केले. पण इस्रायली लष्कराचे गाझापट्टीतील घुसखोरी संघर्षबंदीचे उल्लंघन ठरणारी असल्याचे सांगून हमासने याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती.

सोमवारी रात्री गाझापट्टीच्या उत्तरेकडील सीमाभागातून सर्वप्रथम इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू झाले. हमासने पहिल्या 40 मिनिटांमध्ये इस्रायलमध्ये 80 ते 100 रॉकेट्सचे हल्ले केले. यापैकी एक रॉकेट इस्रायली सैनिकांना घेऊन जाणार्‍या बसवर कोसळले होते. या हल्ल्यात एक इस्रायली सैनिक जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. इस्रायलवर हल्ल्यांसाठी हमासच्या दहशतवाद्यांनी रणगाडाभेदी रॉकेट्सचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.

त्यानंतर तासाभरात हमासने इस्रायलच्या सीमाभागात 300 हून अधिक हल्ले चढविले. यापैकी इस्रायलच्या दक्षिणेकडील अश्केलॉन भागात झालेल्या हमासच्या रॉकेट हल्ल्यामध्ये एका पॅलेस्टिनीचा बळी गेल्याची माहिती समोर येत आहे.

इस्रायली यंत्रणेने 60 हून अधिक रॉकेट्स यशस्वीरित्या भेदल्याचे सांगून आपली ‘आयर्न डोम’ ही यंत्रणा यशस्वी ठरल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. मात्र हमासचे हे रॉकेटहल्ले सुरू असताना, इस्रायली लष्कर व लढाऊ विमानांनी गाझापट्टीवर जोरदार हवाई हल्ले चढविले. गाझातील हमासच्या 70 पेक्षा अधिक ठिकाणांना इस्रायली विमानांनी लक्ष्य केले असून यामध्ये हमासचा प्रसार करणार्‍या?‘अल-अक्सा’ या टीव्ही वाहिनीच्या इमारतीचाही समावेश आहे. त्याचबरोबर हमासच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या मुख्यालयावरही इस्रायलने क्षेपणास्त्र डागले.

या कारवाईबरोबरच इस्रायली लष्कराने गाझापट्टीच्या सीमेजवळील लष्कराची तैनाती वाढविली आहे. इस्रायलच्या लष्कराने आपले पायदळ, रणगाडे, तोफा व लष्करी वाहनांचा मोठा ताफा गाझापट्टीच्या सीमेजवळ तैनात केला आहे. 2014 सालानंतर इस्रायलने पहिल्यांदाच गाझापट्टीजवळ इतक्या मोठ्या प्रमाणात तैनाती केल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर खबरदारी म्हणून इस्रायलच्या सीमेजवळील शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गाझापट्टी व वेस्ट बँकमधील शांतता संशय वाढविणारी असल्याचा दावा इस्रायलची अंतर्गत गुप्तचर संघटना ‘शिन बेत’च्या प्रमुखांनी केला होता. त्याचबरोबर हमास इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याचा इशाराही इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी दिला होता.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info