आपले अस्तित्त्व टिकविण्यासाठी इस्रायल इराणवरही हल्ले चढविल – पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा इशारा

आपले अस्तित्त्व टिकविण्यासाठी इस्रायल इराणवरही हल्ले चढविल – पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा इशारा

जेरूसलेम – ‘इस्रायलची सुरक्षा हीच आमच्यासाठी ‘रेड लाईन’ आहे. सिरिया व लेबेनॉनमधील इराण व इराण समर्थकांनी इस्रायलवर हल्ले चढवून ही रेड लाईन ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. इस्रायलच्या लष्कराने हल्ले चढवून त्यांना योग्य प्रत्युत्तरही दिले. पण यापुढे इराणमधून इस्रायलच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण होणार असेल तर इस्रायल थेट इराणवरही हल्ले चढवू शकतो’, असा सज्जड इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. परदेशी पत्रकारांसमोर बोलताना इस्रायली पंतप्रधानांनी इराणला धमकावले.

इराण आखातात आपला प्रभाव वाढवित असून इराणपासून इस्रायलच नाही आखाती-अरब तसेच युरोपिय देशांनाही धोका असल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू म्हणाले. बुधवारी परदेशी पत्रकारांच्या बैठकीत बोलताना इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराण आणि ‘आयएस’च्या आखातातील वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त केली. यावेळी एका आंतरराष्ट्रीय पत्रकाराने इस्रायली लष्कराच्या सिरियातील कारवाईबाबत पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी प्रश्‍न विचारला. पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इस्रायली लष्कराच्या सिरियातील हवाई हल्ल्यांचे समर्थन केले. तसेच सिरियातील इस्रायलची कारवाई सिरियन लष्कर किंवा जनतेविरोधात नसल्याचेही नेत्यान्याहू यांनी ठासून सांगितले.

इस्रायलचे अस्तित्त्व हीच इस्रायलसाठी रेड लाईन असल्याचे नेत्यान्याहू यावेळी म्हणाले. ‘सिरियातील इराणचे सैनिक व हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांच्या धोकादायक हालचालींमुळे इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. म्हणूनच इस्रायलच्या लष्कराने सिरियातील इराण व हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले चढविले’, असे नेत्यान्याहू यांनी स्पष्ट केले. तसेच इराणने नेहमीच जगाच्या नकाशावरुन इस्रायलला पुसून टाकण्याची धमकी दिली होती, याची आठवण इस्रायली पंतप्रधानांनी यावेळी करून दिली.

इस्रायलच्या अस्तित्वाला थेट इराणमधून धोका निर्माण झाला तर? पत्रकाराच्या या प्रश्‍नाला उत्तर देताना नेत्यान्याहू यांनी इस्रायलच्या सुरक्षेसाठी कुठल्याही लष्करी पर्यायाचा वापर करण्याची तयारी असल्याचे नेत्यान्याहू म्हणाले. अगदी इराणवरही हल्ले चढविण्याची शक्यता नाकारत नसल्याचे इस्रायलच्या पंतप्रधानांनी ठणकावून सांगितले.

आखातातील इराणची आक्रामक धोरणे, तर इस्रायलची दहशतवादविरोधी कारवाई आणि प्रगत तंत्रज्ञान यामुळे एकेकाळी इस्रायलविरोधी असलेले अरब देश आता इस्रायलशी मैत्री करीत आहेत, याचा उल्लेख नेत्यान्याहू यांनी केला. यासाठी इस्रायली पंतप्रधानांनी आपल्या ओमान दौर्‍याचा उल्लेख केला. इस्रायल आणि अरब देशांमध्ये नवे सहकार्य प्रस्थापित होत असल्याचा दावा नेत्यान्याहू यांनी केला.

दरम्यान, सिरियातील इराण व हिजबुल्लाहच्या हालचालींवर चर्चा करण्यासाठी इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या नेते व लष्करी अधिकार्‍यांनी नुकताच रशियाचा दौरा केला. सिरियाबाबत आपली भूमिका रशियालाही पटल्याचे इस्रायलने या भेटीनंतर जाहीर केले.

 English  हिंदी 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info