जगातील एक लाखांहून अधिक जणांना ‘कोरोनाव्हायरस’ची लागण

जगातील एक लाखांहून अधिक जणांना ‘कोरोनाव्हायरस’ची लागण

बीजिंग – गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एक लाखांवर जाऊन पोहोचली आहे. चीनमधून सुरू झालेल्या या साथीत आतापर्यंत ३,४०८ जणांचा बळी गेला असून जागतिक अर्थव्यवस्थेला जोरदार हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी अमेरिका, युरोप व आशियातील शेअरबाजार दणकून आपटले असून जपान, इटली, इराण व दक्षिण कोरियातून साथीच्या मुद्यावर आक्रमक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

  

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या साथीचा जगभरातील ९०हून अधिक देशांमध्ये फैलाव झाल्याची माहिती समोर आली आहे. या देशांमधील जवळपास १ लाख ३८३ जणांना साथीची लागण झाली आहे. अमेरिका, युरोपिय देश, इराण, जपान व दक्षिण कोरियात साथीचा फैलाव वेगाने होत आहे. दक्षिण कोरियात साथीची लागण झालेल्यांची आकडेवारी साडेसहा हजारांवर गेली असून ४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

युरोपिय देशांमध्ये इटलीसह जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्ये वेगाने साथ पसरू लागली आहे. इटलीत जवळपास चार हजार जणांना ‘कोरोनाव्हायरस’ची लागण झाली आहे. जर्मनीतील रुग्णांची संख्या ५००वर गेली असून फ्रान्समध्ये ४२३ रुग्ण आढळले आहेत. इटलीत ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीत मृत्यू पावलेल्यांची संख्या दीडशे झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. ब्रिटनमध्ये साथीचा पहिला बळी गेला असून रुग्णांची संख्या १६०वर जाऊन पोहोचली आहे. इटलीतील ‘व्हॅटिकन सिटी’मध्ये साथीचा रुग्ण आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘कोरोनाव्हायरस’ची व्याप्ती वाढू लागल्याने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अमेरिका, युरोप व आशियातील प्रमुख शेअरबाजार कोसळले असून ही घसरण पुढील आठवड्यातही कायम राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत. सोन्याच्या दरांनीही पुन्हा उसळी घेतली असून शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति औंसामागे १,६७० डॉलर्सचा दर नोंदविण्यात आला.

त्याचवेळी दक्षिण कोरियासह काही देशांमध्ये जनतेतून ‘कोरोनाव्हायरस’ साथीच्या मुद्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सरकारविरोधात असंतोषाची भावना तयार होऊ लागली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info