चीनच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची तिबेटविषयक विधेयकावर स्वाक्षरी

चीनच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची तिबेटविषयक विधेयकावर स्वाक्षरी

वॉशिंग्टन – चीनचे इशारे व धमक्यांची पर्वा न करता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘रेसिप्रोकल अ‍ॅक्सेस टू तिबेट अ‍ॅक्ट २०१८’ विधेयकावर स्वाक्षरी केली. यामुळे सदर विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. या कायद्यामुळे अमेरिकन नागरिकांना तिबेटमध्ये प्रवेश नाकारणार्‍या चिनी अधिकार्‍यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारला जाईल. चीनने याचा निषेध नोंदविला असून याचा अमेरिका व चीनच्या संबंधांवर विपरित परिणाम होणार असल्याचे धमकावले आहे.

१९५१ साली आक्रमण करून चीनने तिबेट ताब्यात घेतला होता. त्यानंतरच्या काळात चीनने तिबेटी जनतेची धार्मिक व सांस्कृतिक ओळख पुसून टाकण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारले होते. मात्र तिबेटी जनतेवरील चीनच्या अत्याचारांची बाब जगासमोर येऊ नये, यासाठी चीनने तिबेटवर कडक नियंत्रण ठेवले आहे. यामुळेच तिबेटला भेट देऊ पाहणार्‍या बहुतांश विदेशी पर्यटकांना चीनकडून प्रवेश नाकारला जातो. आजवर तिबेटचा प्रवास करू पाहणार्‍या अमेरिकेच्या राजनैतिक अधिकारी, पत्रकार तसेच पर्यटकांना चीनकडून नकारच मिळालेला आहे. काही पर्यटकांना तिबेटमध्ये जाण्याची परवानगी दिलीच तरी चीनच्या यंत्रणा त्यांच्या हालचालींवर जाचक निर्बंध लादतात. अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या मूळच्या तिबेटींना धार्मिक पर्यटनासाठीही चीन तिबेटमध्ये येऊ देत नाही.

चीनच्या या धोरणाविरोधात ट्रम्प प्रशासनाने कडक भूमिका स्वीकारून ‘रेसिप्रोकल अ‍ॅक्सेस टू तिबेट अ‍ॅक्ट २०१८’ हे विधेयक अमेरिकी संसदेत मांडले होते. अमेरिकेच्या सिनेट व ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज्’ने हे विधेयक संमत केले असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या विधेयकावर स्वाक्षरीही केली आहे. आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. पुढच्या काळात अमेरिकन अधिकारी व नागरिकांना तसेच पत्रकारांना व्हिसा नाकारणारे चीनच्या अधिकार्‍यांना यापुढे अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही. यामुळे तिबेटबाबतच्या बातम्या बाहेर फुटू नये, यासाठी पराकोटीचे प्रयत्न करणार्‍या चीनला मोठा धक्का बसला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर विपरित परिणाम होईल, असे बजावले. मात्र अमेरिकेच्या या कायद्याचे दूरगामी परिणाम होणार असून चीनच्या जुलमी राजवटीपासून सुटका करून आपला धर्म व संस्कृती वाचविण्यासाठी धडपडत असलेल्या तिबेटच्या जनतेला यामुळे मोठा दिलासा मिळेल.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info