विध्वंसक गैरसमजुतीमुळे रशिया आणि अमेरिकेमध्ये युद्ध भडकेल – रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांचा इशारा

विध्वंसक गैरसमजुतीमुळे रशिया आणि अमेरिकेमध्ये युद्ध भडकेल – रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांचा इशारा

मॉस्को – ‘दोन प्रमुख अण्वस्त्रधारी देश, रशिया आणि अमेरिकामध्ये अणुयुद्ध भडकले तर यामुळे मानवजातीवर मोठे संकट कोसळेल, हे जगातील प्रत्येक देशाला माहित आहे. त्यामुळे कुणीही या दोन्ही देशांना अणुयुद्धाकडे ढकलण्याची चूक करणार नाही. पण एखादी चूक आणि दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावामुळे निर्णायक पातळीवर गैरसमजूत निर्माण झाली तर मात्र या दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकू शकते’, असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला.

रशियन माध्यमांशी बोलताना परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी अमेरिकेबरोबर कुठल्याही प्रकारे संघर्ष भडकू नये, यासाठी रशिया जोरदार प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. रशिया व अमेरिकेतील अणुयुद्ध कुणीही जिंकू शकत नसल्याचे लॅव्हरोव्ह यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्य म्हणजे सर्वाधिक अण्वस्त्रे असणार्‍या या दोन देशांमध्ये अणुयुद्ध पेटू नये, हे सर्वांच्याच भल्याचे आहे, असे रशियन परराष्ट्रमंत्री म्हणाले.

पण अमेरिका आणि अमेरिकेचे पाश्‍चिमात्य मित्रदेश भौगोलिक महत्त्वाकांक्षेने भारलेले असून ते बदलत्या जागतिक घडामोडींशी जुळवून घेण्याच्या तयारीत नाहीत, असा आरोप परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी केला. पाश्‍चिमात्य देशांच्या या वाढत्या महत्त्वाकांक्षेमुळे ते अधिकाधिक संघर्षाला सामोरे जात असल्याचा दावा लॅव्हरोव्ह यांनी केला.

यामुळे अमेरिका व रशियाच्या परराष्ट्र धोरणांवर परिणाम होत असून चर्चेचे मार्ग हळुहळू बंद होत असल्याची शक्यता रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी वर्तविली. अशा परिस्थितीत एखाद्या दुर्घटनेमुळे, गैरसमजुतीमुळे रशिया व अमेरिकेमध्ये संघर्ष पेट घेऊ शकतो. असे झाले तर मानवजातीसाठी ते मोठे संकट ठरेल, असा इशारा रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी दिला.

रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी उघडपणे कुठल्याही वादाचा उल्लेख केला नसला तरी ‘इंटरमिजिएट-रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी’ (आयएनएफ), युक्रेनचा वाद, सिरियातील संघर्ष यामुळे अमेरिका व रशियामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info