बगदाद – सिरियातून अमेरिकन सैन्याच्या माघारीची घोषणा करून काही दिवस उलटत नाही, तोच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकला भेट दिली. त्यांच्या या आकस्मिक दौर्याने सार्या जगाचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व ‘फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प’ यांनी इराकच्या ‘अल-असाद’ हवाईतळाला भेट दिली. या तळावरील अमेरिकन सैनिकांशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संवाद साधला. सिरियातील सैन्यमाघारीचे समर्थन करून यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या माघारीचा इस्रायलच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही, अशी ग्वाही दिली.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सिरियातून सैन्यमाघारी घेण्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयाचे फार मोठे राजकीय व सामरिक पडसाद उमटले. संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी या निर्णयावर असहमती व्यक्त करून राजीनामा दिला आहे. त्याचवेळी ट्रम्प यांच्या विरोधकांनी या निर्णयावर सडकून टीका केली. सिरियातील अमेरिकेच्या मोहिमेला सहकार्य करणार्या फ्रान्ससारख्या देशानेही ही सैन्यमाघार घातक ठरेल, असे बजावले आहे. पण इस्रायल व तुर्की या देशांना विश्वासात घेऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
‘अल-असाद’ हवाईतळावर अमेरिकन सैनिकांना संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘आयएस’ला संपविण्यासाठी अमेरिकन सैन्य सिरियामध्ये दाखल झाले होते, याची आठवण करून दिली. सिरियात ‘आयएस’चा पराभव झाल्याने आता या देशात अमेरिकेचे सैन्य तैनात ठेवण्यात अर्थ नाही, असे ट्रम्प म्हणाले. मात्र सिरियातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असला, तरी अमेरिकेने इस्रायलच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलेले नाही, असे स्पष्ट केले. अमेरिका इस्रायलला दरवर्षी ४.५ अब्ज डॉलर्सचे सहाय्य करीत आहे व त्याचा इस्रायकडून स्वसंरक्षणासाठी योग्यरितीने वापर केला जातो. इस्रायल आपल्या सुरक्षेसाठी समर्थ बनलेला आहे. तरीही इस्रायलची सुरक्षा धोक्यात आली, तर अमेरिका ठामपणे आपल्या या मित्रदेशाच्या मागे उभी राहिल’, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली.
मात्र अमेरिकेच्या सिरियातील सैन्यमाघारीचा इस्रायलच्या सुरक्षेवर विशेष परिणाम होणार नाही, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, ट्रम्प यांची ही आकस्मिक इराकभेट जगभरातील निरिक्षकांचे लक्ष वेधून घेणारी बाब ठरते. सिरियातील सैन्यमाघारीच्या निर्णयाचा या इराकभेटीशी संबंध असण्याची शक्यताही या निमित्ताने समोर येत आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कुठल्याही स्वरुपाची माहिती समोर आलेली नाही.
अमेरिका अन्बर प्रांतात लष्करी तळ उभारणार
सिरियातील सैन्यमाघारीचा परिणाम इराकमधील तैनातीवर होणार नसल्याची घोषणा अमेरिकी लष्कराने केली आहे. यासाठी इराकच्या अन्बर प्रांतात अमेरिकी लष्कराचे दोन नवे तळ उभारणार असल्याचे इराकच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. सिरियाच्या सीमेरेषेजवळ असलेल्या ‘अल-कईम’ या जिल्ह्यात सर्वात पहिले लष्करी तळ उभारण्यात येणार आहे. या लष्करी तळामुळे सिरिया व इराकच्या सीमेवरील ‘आयएस’ व संलग्न दहशतवादी संघटनांच्या कारवाईवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल, असा दावा अमेरिकेने केला आहे.
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |