एका देशाचा सायबरहल्ला हा ऑस्ट्रेलियाच्या सार्वभौमत्वाचा अपमान – माजी अधिकाऱ्यांचा इशारा

एका देशाचा सायबरहल्ला हा ऑस्ट्रेलियाच्या सार्वभौमत्वाचा अपमान – माजी अधिकाऱ्यांचा इशारा

कॅनबेरा – ‘कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर जगभरात दुसऱ्या देशांची बौद्धिक संपदा चोरण्याच्या हालचाली सुरू आहेत. आपली अर्थव्यवस्था व उद्योग क्षेत्र इतरांपेक्षा आघाडीवर रहावे यासाठी डल्ला मारण्याचा कारवाया सुरू आहेत. ही अत्यंत घृणास्पद गोष्ट असून जागतिक सहकार्याच्या दृष्टीने योग्य नाही. ऑस्ट्रेलियावर झालेल्या सायबरहल्ल्यांचा हेतू धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करण्याबरोबरच बौद्धिक संपदेची चोरी हा देखील होता. हा सायबरहल्ला ऑस्ट्रेलियाच्या सार्वभौमत्वाचा अपमान ठरतो’, असा इशारा देशाचे माजी सायबर सुरक्षा सल्लागार अलिस्टर मॅकगिबन यांनी दिला.

गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी, देशातील सरकारी, राजकीय तसेच व्यावसायिक यंत्रणांवर सायबरहल्ले वाढल्याचे जाहीर केले होते. या सायबरहल्ल्यांमागे एका देशाचा हात असल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. त्यानंतर, ऑस्ट्रेलियन माध्यमे व अभ्यासगटांनी सायबरहल्ल्यांमागे चीनचाच हात असल्याचा आरोप केला होता. मात्र चीनने हे आरोप फेटाळले होते.

सध्या ऑस्ट्रेलिया व चीनमधील तणाव सातत्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. ऑस्ट्रेलियातील राजकीय क्षेत्रासह इतर अनेक महत्त्वाच्या व संवेदनशील क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. त्याचवेळी साऊथ चायना सीबरोबरच इंडो पॅसिफिक क्षेत्रातील चीनची वाढती दादागिरी, ‘५जी’ व मानवाधिकारांच्या मुद्द्यावरही ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये वारंवार खटके उडाले आहेत. त्यात कोरोना साथीची भर पडली असून ऑस्ट्रेलियन नेतृत्वाने चीनच्या विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

आपल्याविरोधात भूमिका घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन नेतृत्वाला गंभीरबपरिणाम भोगावे लागतील असे चीनच्या राजवटीने वारंवार धमकावले आहे. ऑस्ट्रेलियावरील दडपण वाढवण्यासाठी चीनकडून आर्थिक व व्यापारी संबंधांसह सायबरहल्ल्यांचाही वापर करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाची संसद, पंतप्रधान कार्यालय व इतर महत्त्वाच्या यंत्रणांवर झालेल्या सायबरहल्ल्यामागे चीनचा हात असल्याचा अहवाल ऑस्ट्रेलियन यंत्रणांनी दिला होता. सायबरसुरक्षा क्षेत्रातील कंपन्या व अभ्यासगटांनीही याला दुजोरा दिला होता.

या पार्श्‍वभूमीवर, ऑस्ट्रेलियाच्या माजी सायबर सुरक्षा सल्लागारांनी दुसऱ्या देशाकडून झालेला सायबरहल्ला हा थेट देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे सांगून हा अत्यंत गंभीर व संवेदनशील विषय असल्याकडे लक्ष वेधले आहे. माजी सल्लागार मॅकगिबन यांनी चीनचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांचे वक्तव्य चीनकडेच बोट दाखविणारे आहे असा दावा विश्लेषक करीत आहेत.

गेल्या महिन्यात, चीनच्या लष्कराशी संबंध असलेल्या ‘नायकॉन’ या हॅकर्सच्या गटाकडून प्रगत ‘सायबरवेपन्स’च्या सहाय्याने आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांवर सायबरहल्ले होत असल्याचा दावा इस्रायली कंपनीने केला होता. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान कार्यालयावर झालेल्या सायबरहल्ल्यादरम्यान ही बाब उघडकीस आल्याचे ‘चेकपॉइंट’ या इस्रायली कंपनीने आपल्या अहवालात म्हटले होते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info