स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या तैवानला चीनकडून लष्करी कारवाईची धमकी

स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या तैवानला चीनकडून लष्करी कारवाईची धमकी

बीजिंग/तैपेई – ‘तैवानने स्वातंत्र्याची मागणी सोडून द्यावी आणि एक देश दोन व्यवस्थेच्या आधारावर शांततेने चीनमध्ये विलिन व्हावे. पण तैवान स्वातंत्र्याच्या भूमिकेवर ठाम राहणार असेल तर चीन देखील लष्करी कारवाईच्या पर्यायाचा विचार करू शकतो’, असा सज्जड इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला. पण आपला हा इशारा तैवानसाठी नसून तैवानची पाठराखण करणार्‍या अमेरिकेसाठी होता, असे जिनपिंग यांनी स्पष्ट केले.

लष्करी कारवाई, स्वातंत्र्याची मागणी, शी जिनपिंग, तैवान, ढवळाढवळ, चीन, अमेरिका

तैवान हा चीनचा अविभाज्य भूभाग असल्याचा दावा करून तैवानमधील अमेरिकेच्या हस्तक्षेपावर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आक्षेप घेतला. ‘तैवान हा चीनच्या अंतर्गत राजकारणाचा भाग आहे. तैवानप्रकरणात इतर कुठल्याही देशाची ढवळाढवळ सहन करणार नाही’, असे जिनपिंग यांनी जाहीर केले. त्याचबरोबर हाँगकाँगप्रमाणे तैवानने देखील ‘एक देश दोन व्यवस्था’ या आधारावर चीनमध्ये सामिल व्हावे, अशी सूचना चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी केली.

‘चीन आपल्याच जनतेविरोधात संघर्ष करीत नाही. पण त्याचवेळी चीन लष्करी कारवाईचा वापर न करण्याचे बंधन स्वतःवर लादणारर नाही. लष्करी कारवाईबाबतचे सर्व पर्याय चीन स्वत:कडे राखून ठेवील’, अशी धमकी जिनपिंग यांनी दिली. जिनपिंग यांची ही धमकी प्रसिद्ध होण्याच्या आधी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई ईंग-वेन’ यांनी चीनवर टीका केली होती. तैवानच्या औदार्याचा चीन गैरफायदा घेत असल्याचा आरोप करून तैवान स्वतंत्र असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांनी केली होती.

त्यावर चीनच्या राष्ट्राध्यक्षांची ही प्रतिक्रिया आली आहे. तैवानची स्वातंत्र्याची मागणी ‘डेड एन्ड’ असून तैवान कधीच स्वतंत्र होऊ शकत नाही, असे जिनपिंग यांनी जाहीर केले. चीनच्या इशार्‍यानंतरही तैवान शस्त्रसज्जता वाढविण्यासाठी अमेरिकेचे सहाय घेणार असेल तर चीन त्याला प्रत्युत्तर देईल, असा इशारा जिनपिंग यांनी दिला.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेने तैवानला देण्यात येणार्‍या लष्करी सहाय्यात वाढ केली असून तैवानच्या ‘त्साई’ सरकारबरोबर राजकीय सहकार्य अधिकच दृढ केले आहे. अमेरिका व तैवानमधील या सहकार्यामुळे चीन अधिकाधिक अस्वस्थ बनत चाल्याचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या विधानावरुन स्पष्ट होत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info