वॉशिंग्टन/अंकारा – सिरियातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर कुर्द बंडखोरांवरुन अमेरिका आणि तुर्कीतील मतभेद तीव्र झाले आहेत. अमेरिकेच्या सूचनेनंतरही तुर्कीने सिरियातील कुर्दांवर हल्ले चढविले तर अमेरिका तुर्कीची अर्थव्यवस्था नष्ट करील, असा सज्जड इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. पण अमेरिकेच्या इशार्याची पर्वा न करता कुर्दांवरील हल्ले सुरू राहतील, अशी घोषणा तुर्कीने केली आहे.
गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सिरियातून सैन्यमाघार घेण्याची घोषणा करून या क्षेत्रातील आपल्या मित्रदेशांना आश्चर्याचा धक्का दिला होता. रविवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या या निर्णयाचे समर्थन करताना, तुर्की तसेच कुर्द बंडखोर, इराण आणि दहशतवादी संघटनांना इशारा दिला.
‘सिरियातून सैन्यमाघार हा प्रलंबित प्रश्न होता. चारही बाजूंनी ‘आयएस’वर हल्ले चढवून आणि या दहशतवादी संघटनेचा प्रभाव कमी करून अमेरिका आता सिरियातून माघार घेत आहे. पण दहशतवादी संघटना सिरियामध्ये पुन्हा प्रबळ झाल्या तर अमेरिका इराकमधूनही सिरियावर हल्ले चढवू शकतो’, याची जाणीव राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करून दिली.
तर अमेरिकेच्या सैन्यमाघारीचीही वाट न पाहता सिरियातील कुर्द व इतर दहशतवादी संघटनांवर हल्ल्याची धमकी देणार्या तुर्कीलाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बजावले. ‘तुर्कीने कुर्दांवर हल्ले चढविले तर तुर्कीला अमेरिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. अमेरिका तुर्कीची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करील. हे टाळायचे असेल तर तुर्कीने २० मैल अंतराचे सुरक्षित क्षेत्र तयार करावे. तसेच कुर्दांनीही तुर्कीवर हल्ले चढवून चिथावणी देऊ नये’, असे ट्रम्प यांनी फटकारले.
यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी रशिया, इराण आणि सिरियावर टीका केली. अमेरिकेने सिरियातील ‘आयएस’चा खात्मा केल्याचा सर्वाधिक फायदा रशिया, इराण आणि सिरियाला होणार आहे. म्हणूनच आता सिरियातील हे युद्ध थांबले पाहिजे, असे आवाहन ट्रम्प यांनी केले.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या इशार्याला तुर्कीने प्रत्युत्तर दिले. अमेरिकेने आपल्या नाटो मित्रदेशाबरोबरील सहकार्याचा आदर करावा. अमेरिका दहशतवाद्यांबरोबर सहकार्य प्रस्थापित करू शकत नाही, असे सांगून तुर्कीतील एर्दोगन सरकारने सिरियातील कुर्दांविरोधी कारवाई सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, तुर्कीने सिरियाच्या सीमेवर सैन्य तैनात केल्यापासून तुर्कीचे चलन ‘लिरा’च्या दरात मोठी घसरण झाली होती. ट्रम्प यांच्या इशार्यानंतर सोमवारी ‘लिरा’च्या मूल्यात नवी घसरण पहायला मिळाली. गेल्या वर्षभरात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ‘लिरा’चे मूल्य ३० टक्क्यांनी घसरले असून याचे तुर्कीच्या अर्थव्यवस्थेला फार मोठे धक्के बसत आहे.
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |