संयुक्त राष्ट्रे – येमेनमध्ये गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या आगीत इंधन ओतण्याचे काम इराणने केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात केला आहे. इराणचे इंधन बेकायदेशीर मार्गाने येमेनच्या ‘हौथी’ बंडखोरांच्या ताब्यातील बंदरात दाखल होत असून त्याद्वारे दर महिन्याला किमान तीन कोटी डॉलर्स बंडखोरांना मिळत असल्याचे मानले जाते. गेल्याच महिन्यात इराणची क्षेपणास्त्रे हौथी बंडखोरांना मिळत असल्याचा अहवाल उघड झाला होता. त्यापाठोपाठ आता इराणी राजवट इंधनाच्या माध्यमातूनही हौथी बंडखोरांना सहाय्य करीत असल्याचे उघड झाल्याने इराण पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हौथी बंडखोरांना मिळत असलेल्या इराणी इंधनाचा ८५ पानी अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे सादर करण्यात आला असून लवकरच यावर चर्चा होण्याचे संकेत देण्यात आले आहे. या अहवालात सौदी अरेबिया व सहकारी देशांच्या आघाडीकडून येमेनमध्ये सुरू असणार्या मोहीमेचा उल्लेख करण्यात आला आहे. हौथी बंडखोरांविरोधात सुरू असणार्या कारवाईला यश मिळत असले तरी पूर्ण येमेनवर सरकारचे नियंत्रण राहिल, अशी स्थिती अद्यापही तयार करता आलेली नाही, याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
येमेन तसेच येमेनव्यतिरिक्त काही देशांमध्ये बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून या कंपन्या इराणच्या अवैध इंधनव्यापारासाठी ‘फ्रंट’ म्हणून काम करीत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने इराणच्या बंदरांमध्ये उभ्या जहाजांमध्ये इंधन भरले जाते आणि ते येमेन व इतर देशांमध्ये पाठवून त्याच्या विक्रीतून येणारा पैसा हौथी बंडखोरांना दिला जातो, असा आरोप अहवालात करण्यात आला आहे.
इराणने येमेनमधील संघर्षात ‘हौथी’ बंडखोरांना देण्यात येणार्या सहाय्याबाबतचे आरोप वारंवार नाकारले आहेत. मात्र सुरक्षा परिषदेला सादर केलेल्या अहवालात यासंदर्भात ठोस पुरावे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे इराणला आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर देणे अधिक कठीण होणार आहे. येमेनच्या संघर्षातील उघड झालेला सहभाग इराणमधील सत्ताधारी राजवटीला अधिक अडचणीत आणणारा ठरेल, असे संकेत सूत्रांकडून देण्यात येतात.
अमेरिका व सौदी अरेबियाकडून हा मुद्दा अधिक आक्रमकपणे उपस्थित केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी सौदीकडून सुरू असलेली हौथी बंडखोरांविरोधातील मोहीमही अधिक आक्रमक केली जाऊ शकते. इराणकडून हौथी बंडखोरांना पुरविण्यात येणारी शस्त्रास्त्रे हादेखील वादाचा मुद्दा असून यामुळे इराणचे समर्थन करणारे युरोपिय देश तसेच इतर सहकारी अडचणीत येऊ शकतात.
येमेनमध्ये आतापर्यंत झालेल्या संघर्षात लाखो जणांचा बळी गेला असून देशात भयानक मानवतावादी आपत्ती निर्माण झाल्याचा दावा करण्यात येतो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |