तालिबानच्या सरकारमधील हक्कानी नेटवर्कचा प्रभाव अमेरिकेच्या सुरक्षेसाठी घातक ठरेल – अमेरिकेच्या एफबीआय, होमलँड व दहशतवादविरोधी विभागाचा इशारा

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील तालिबानच्या मंत्रीमंडळातील महत्त्वाच्या पदांवर सिराजुद्दीन हक्कानीसह हक्कानी नेटवर्कच्या प्रमुख कमांडर्सची नियुक्ती झाली आहे. तालिबानच्या सरकारवरील हक्कानी नेटवर्कची ही पकड चिंतेची बाब असून अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा अमेरिकेच्या प्रमुख सुरक्षा व गुप्तचर विभागाने दिला आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकन सिनेटर्सनी तालिबानला दहशतवादी संघटना घोषित करून तालिबानच्या राजवटीला मान्यता देणार्‍या देशांवर निर्बंध टाकण्याची मागणी केली होती.

अफगाणिस्तानातील तालिबानचे सरकार सर्वसमावेशक असावे, अशी मागणी जगभरातील प्रमुख जबाबदार देश करीत आहेत. यामध्ये सर्व गटांना तसेच महिलांनाही स्थान मिळावे, असे आवाहन केले जात आहे. पण गेल्या दोन आठवड्यांमध्ये तालिबानने जाहीर केलेल्या मंत्रीमंडळावर हक्कानी नेटवर्कचा मोठा प्रभाव असल्याचे उघडपणे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी करणार्‍या मुल्ला बरादर आणि त्याच्या समर्थकांना हक्कानी नेटवर्कने एकटे पाडल्याचा दावा केला जातो.

तालिबानचा पंतप्रधान घोषित मुल्ला अखुंद हा हक्कानी नेटवर्क व पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या मर्जीतील आहे. त्याचबरोबर तालिबानच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेच्या मोस्ट वॉंटेड यादीत असलेल्या सिराजुद्दीन हक्कानीकडे सोपविली आहे. ‘आयएसआय’च्या इशार्‍यावर तालिबानच्या या मंत्रीमंडळाची स्थापना झाल्याचा आरोप पाश्‍चिमात्य विश्‍लेषक व माध्यमे करू लागली आहेत. गेले काही दिवस अमेरिकेच्या सिनेटमधील वेगवेगळ्या समित्यांमध्ये या मुद्यावर चिंता व्यक्त केली जात आहे.

‘सिनेट होमलँड सिक्युरिटी अँड गव्हर्नमेंटल अफेअर्स कमिटी’ने अमेरिकेच्या एफबीआयचे संचालक ख्रिस्तोफर रे, होमलँड सिक्युरिटीचे प्रमुख अलेक्झांड्रो मायोकास आणि राष्ट्रीय दहशतवादविरोधी विभागाच्या संचालिका ख्रिस्तीन अबिझैद यांना याविषयी विचारणा केली. ‘ज्याप्रकारे आपण अफगाणिस्तानातून माघार घेतली, ते पाहता दिर्घकाळ सुरू असलेले युद्ध संपले तरी अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकच धोकादायक बनवून ठेवली आहे’, असा शेरा सदर समितीचे सदस्य सिनेटर रॉब पोर्टमन यांनी ओढला.

यावर उत्तर देताना अमेरिकेच्या सुरक्षा विभागाच्या प्रमुखांनीही अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. एफबीआयने सिराजुद्दीनच्या शिरावर एक कोटी डॉलर्सचे ईनाम घोषित केले असून या दहशतवाद्याला तालिबानच्या सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान मिळणे, ही खरोखरच चिंतेची बाब असल्याचे रे म्हणाले. तर हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांची तालिबानच्या सरकारमध्ये मोठ्या पदांवर झालेली नियुक्ती अमेरिकेच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांसाठी घातक असल्याचे अमेरिकन सुरक्षा यंत्रणेच्या तीनही प्रमुखांनी मान्य केले.

अफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार व त्यानंतर अफगाणिस्तान तालिबानच्या नियंत्रणाखाली गेल्यामुळे अल कायदाचा धोका वाढल्याचा इशारा ख्रिस्तिन अबिझैद यांनी दिला. अल कायदाला अफगाणिस्तानात सुरक्षित स्थान मिळत असून अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे अबिझैद म्हणाल्या. अमेरिकेचे लष्करी विश्‍लेषक व माजी अधिकारी देखील तालिबानची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर, अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र बनेल, असे इशारे देत आहेत. तसे झाले की अफगाणिस्तानच्या शेजारी देशांबरोबर युरोप व अमेरिकेलाही अफगाणिस्तानातून उदयाला येणार्‍या दहशतवादाचे हादरे बसतील, असे या लष्करी विश्‍लेषक व माजी अधिकार्‍यांनी बजावले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info