अमेरिकेतील कृष्णवर्णियांना स्वतंत्र देश हवा – ‘नेशन ऑफ इस्लाम’चे नेते लुईस फराखान यांची मागणी

अमेरिकेतील कृष्णवर्णियांना स्वतंत्र देश हवा – ‘नेशन ऑफ इस्लाम’चे नेते लुईस फराखान यांची मागणी

वॉशिंग्टन – ‘होय! अमेरिकेतील कृष्णवर्णिय स्वतंत्र देशासाठीच प्रयत्न करीत आहेत. पूर्ण स्वतंत्र देश! ६०च्या दशकापासून आमची मागणी हीच राहिली आहे. आम्ही अमेरिकी समाजात एकजीव होण्याचे दावे कधीच केले नाहीत. आम्ही कायम, स्वतंत्र देश स्थापन करण्याची वेळ आली आहे, असेच सांगत आहोत. अमेरिकेतील कृष्णवर्णियांचे बळ केवळ लंच काऊंटरवर एकत्र बसण्यासाठी वापरायचे नाही. तर या सामर्थ्याचा वापर चार ते पाच कोटी कृष्णवर्णिय जनतेसाठी स्वतंत्र देश स्थापन करण्यासाठी करायचा आहे’, अशा शब्दात अमेरिकेतील ‘नेशन ऑफ इस्लाम’ गटाचे नेते लुईस फराखान यांनी कृष्णवर्णियांसाठी स्वतंत्र देश हवा असल्याची खळबळजनक मागणी केली.

सोशल मीडियावर टाकलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘नेशन ऑफ इस्लाम’च्या नेत्यांनी स्वतंत्र देशाची मागणी केल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ २०१५ साली झालेल्या एका कार्यक्रमातील असल्याची माहिती ‘फॉक्स न्यूज’ या अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने दिली आहे. गेल्या वर्षभरात लुईस फराखान यांनी सोशल मीडियावरून ज्यूधर्मियांविरोधात तसेच अमेरिकेविरोधात वक्तव्ये केल्याचेही समोर आले होते. काही महिन्यांपूर्वी लुईस फराखान व त्यांच्या सहकार्‍यांनी इराणला भेट दिल्याची माहितीही पुढे आली आहे.

नोव्हेंबर महिन्यात इराणला दिलेल्या भेटीत ‘नेशन ऑफ इस्लाम’चे नेते फराखान यांनी एका मुलाखतीत, अमेरिका हा कधीच लोकशाहीवादी देश नव्हता असा दावा करून ‘डेथ टू अमेरिका’ व ‘डेथ टू इस्रायल’ अशा प्रक्षोभक घोषणा दिल्या होत्या.

सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओत त्यांनी १९३० साली स्थापन झालेल्या ‘नेशन ऑफ इस्लाम’ या कृष्णवर्णियांच्या संघटनेचे ध्येय स्वतंत्र देश हेच होते, असे वारंवार बजावले आहे. अमेरिकेत या गटाचे जवळपास ५० हजार सदस्य असल्याचा दावा करण्यात येत असून फराखान १९७७ पासून प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

गेल्या काही वर्षात अमेरिकेत कृष्णवर्णिय नागरिकांवर होणार्‍या हल्ल्यांना व कारवायांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असून ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ हे स्वतंत्र आंदोलनही उभे राहिले आहे. या आंदोलनाने अमेरिकेतील कृष्णवर्णियांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात यश मिळविले. यामुळे जागतिक समुदायाकडून कृष्णवर्णियांना मिळणारे समर्थन वाढल्याचेही समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘नेशन ऑफ इस्लाम’च्या नेत्यांकडून स्वतंत्र देशाची मागणी समोर येणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info