चीनकडून उघुरवंशियांवर केल्या जाणार्‍या अत्याचारांवर तुर्कीची घणाघाती टीका

चीनकडून उघुरवंशियांवर केल्या जाणार्‍या अत्याचारांवर तुर्कीची घणाघाती टीका

अंकारा – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने उघुरवंशिय इस्लामधर्मियांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात तुर्कीने घणाघाती टीका केली आहे. ‘चीनकडून अल्पसंख्यांकांना मिळणारी वागणूक मानवतेला काळीमा फासणारी व मानवाधिकारांचे उल्लंघन करणारी आहे’, अशी टीका तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. त्याचबरोबर उघुरवंशिय इस्लामधर्मियांना चीनमधील बहुसंख्यांकांमध्ये मिसळून टाकण्यासाठी चीन राबवित असलेल्या धोरणांनाही तुर्कीने लक्ष्य केले. याआधी चीनमधील उघुरवंशियांवर चीनने केलेल्या कारवाईवर अमेरिका, ऑस्ट्रेलियाने टीका केली होती. पण उघुरवंशियांवरील अत्याचारावरुन सहकारी देशानेच चीनला सुनावले आहे.

‘चीन उघुरवंशियांची गळचेपी करून त्यांना पद्धतशीरपणे कम्युनिस्ट प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तुर्कभाषिक असलेल्या उघूरवंशियांवरील चीनची ही कारवाई मानवतेच्या दृष्टीने अतिशय लाजीरवाणी बाब ठरते’, असा हल्ला तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हमी अक्सॉय यांनी चढविला. चीनने लाखो उघुरवंशियांना अटक करून त्यांना मोठ्या शिबिरांमध्ये डांबल्याचे सत्य जगापासून लपून राहिलेले नाही, असे टीकास्त्र अक्सॉय यांनी सोडले. चीनने मानवाधिकारांचा आदर करून या उघुरवंशियांवरील दडपशाही बंद करावी आणि सर्व अल्पसंख्यांकांना या अमानवी शिबिरातून मुक्त करावे, अशी मागणी अक्सॉय यांनी केली.

चीनने उघुरवंशिय आणि तुर्क भाषिक अल्पसंख्यांकांची वेळीच सुटका केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, याचीही जाणीव अक्सॉय यांनी करुन दिली. चीनच्या वायव्येकडील झिंजियांग प्रांतातील उघुरवंशियांवर जिनपिंग सरकारकडून अत्याचार होत आहे याची कल्पना तुर्कीच्या जनतेला आहे व त्याविरोधात प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. चीनने उघुरवंशियांवरील कारवाई सुरू ठेवली तर त्याचे पडसाद तुर्कीमध्येही उमटू शकतात, असा इशारा अक्सॉय यांनी दिला.

गेल्या वर्षी चीनने लाखो उघुरवंशियांना ‘कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’मध्ये डांबल्याची माहिती समोर आली होती. दहशतवादविरोधी कारवाईअंतर्गत चीनने उघुरवंशिय तरुणांना ताब्यात घेतले होते. तसेच आपला धर्म सोडण्यासाठी चीनकडून उघुरवंशियांवर दबाव टाकला जात असल्याचेही समोर आले आहे.

चीनमधील धार्मिक व वांशिक अल्पसंख्यांकांवरील दडपशाही अधिकच वाढली असून हा मानवतेविरोधातील गंभीर गुन्हा ठरतो, असा इशारा अमेरिकेच्या संसदीय समितीने दिला होता. चीन पद्धतशीरपणे उघुरवंशियांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचे तसेच अमेरिकेवरील हेरगिरीसाठी त्यांचा वापर करीत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. चीनने हे आरोप फेटाळले होते. मात्र काही दिवसांमध्ये या कॅम्पमध्ये एका उघुरवंशियाचा बळी गेल्यानंतर चीनवर आंतरराष्ट्रीय स्तरातून जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यानंतर चीनला उघुरवंशियांना डांबल्याची कबुली द्यावी लागली होती. पण इथे कुठल्याही प्रकारचा अन्याय होत नसल्याचे चीनचे म्हणणे आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info