‘पुलवामा’चा सूड घेणार्‍या वायुसेनेच्या जबरदस्त हल्ल्यात पाकिस्तानच्या ‘बालाकोट’मधील ‘जैश’चा तळ उद्ध्वस्त – ३५० हून अधिक दहशतवादी ठार

‘पुलवामा’चा सूड घेणार्‍या वायुसेनेच्या जबरदस्त हल्ल्यात पाकिस्तानच्या ‘बालाकोट’मधील ‘जैश’चा तळ उद्ध्वस्त – ३५० हून अधिक दहशतवादी ठार

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या बालाकोट येथील ‘जैश-ए-मोहम्मद’चा तळ भस्मसात करून भारताने पुलवामामधील आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मंगळवारची पहाट या सुखद बातमीसह उजाडली आणि देशभरात जल्लोष सुरू झाला. पाकिस्तानव्याप्त काश्मीर व त्याच्याही पलिकडे जाऊन पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनवाला प्रांतातील ‘जैश’च्या प्रशिक्षण तळाला वायुसेनेच्या ‘मिराज २०००’ने लक्ष्य केले. सुमारे सहा हजार किलो वजनाच्या बॉम्ब्सचा वापर या हल्ल्यात झाला असून किमान ३५० दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जाते. तर माध्यमांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूत्रांच्या हवाल्याने ठार?झालेल्या दहशतवाद्यांची संख्या ६०० ते ६५० इतकी असल्याचा दावा केला आहे.

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील वायुसेनेच्या तळावरून १२ ‘मिराज २०००’ लढाऊ विमाने पहाटे ३.३० च्या सुमारास निघाली आणि काही मिनिटातच पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवाला प्रांतातील ‘बालाकोट’ येथील ‘जैश’च्या सर्वात मोठ्या प्रशिक्षण तळावर बॉम्बहल्ला सुरू झाला. ‘जैश’सह ‘लश्कर-ए-तोयबा’ आणि ‘हिजबुल मुजाहिद्दीन’कडून देखील या तळावर दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाबरोबरच दहशतवादी या तळाचा ‘कमांड अँड कम्युनिकेशन सेंटर’ म्हणूनही वापर करतात. यामुळे इथे शेकडोंच्या संख्येने दहशतवादी होते.

या हल्ल्यात सुमारे एक हजार किलो इतके वजन असलेले सहा बॉम्ब वापरण्यात आले. अचूक लक्ष्यभेदासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय वायुसेनेच्या ‘मिराज २०००’ विमानांनी हा तळ बेचिराख करून सुमारे ३२५ दहशतवादी व त्यांना प्रशिक्षण देणार्‍या २५ ते २७ जणांना एका क्षणात संपविल्याची माहिती दिली जाते. तर माध्यमांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूत्रांचा हवाला देऊन ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या ६०० ते ६५० इतकी असल्याचे म्हटले आहे. भारतीय वायुसेनेची ही कारवाई २१ मिनिटांपर्यंत सुरू होती. पाकिस्तानी वायुसेनेच्या ‘एफ-१६’ विमानांनी ‘मिराज २०००’ला रोखण्यासाठी उड्डाणही केले होते. एकाच वेळी १२ विमानांशी मुकाबला करावा लागेल याची जाणीव झाल्यानंतर पाकिस्तानची ही लढाऊ विमाने पुन्हा तळावर परतल्याचे सांगितले जाते.

पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरून ‘बालाकोट’ येथे भारतीय वायुसेना हल्ला चढवील, याचा विचारही पाकिस्तानने केला नव्हता. त्यामुळे पूर्णपणे गाफिल असलेल्या पाकिस्तानचे या हल्ल्याने डोळे पांढरे झाले आहेत. बालाकोटमधील हल्ल्यानंतर पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवरही हल्ले चढविण्यात आले. यामध्ये मुझफ्फराबाद व चकोटी येथील तळांचा समावेश आहे. पहाटे ४ वाजून पाच मिनिटांपर्यंत वायुसेनेची ही सारी कारवाई पूर्ण झाली होती. या जबरदस्त कामगिरीद्वारे भारतीय वायुसेनेने आपले कौशल्य आणि व्यावसायिकता सिद्ध केल्याचे समोर येत असून वायुसेनेच्या माजी अधिकार्‍यांनी तसेच माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषकांनी त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

या हल्ल्याद्वारे पाकिस्तानला आवश्यक तो धडा मिळाल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया भारतातून उमटत आहे. काही ठिकाणी या हल्ल्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. पुलवामामधील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांनी वायुसेनेच्या या कारवाईचे स्वागत केले. त्याचवेळी पाकिस्तानला अधिक मोठ्या प्रमाणात धडा शिकविण्याची गरज आहे, असे एका शहीद जवानांच्या पत्नीने म्हटले आहे.

 

दुष्टांचा नाश करणारी परमेश्‍वरी शक्ती आपल्यासोबत –  पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘मानवतेच्या शत्रूंपासून पृथ्वीला वाचविण्यासाठी परमेश्‍वराची शक्ती आपल्याबरोबर कायम असते, हा संदेश आम्ही दुष्टात्मे आणि असूरांना देण्याचा प्रयत्न पूर्ण प्रमाणिकपणे करीत आहोत’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर हे सूचक उद्गार काढले आहेत. ‘परमेश्‍वराची शक्ती सतत आपल्यासोबत आहे. देशाचे सर्वश्रेष्ठ अजूनही जगासमोर आलेले नाही’, पंतप्रधान पुढे म्हणाले.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी जनतेकडून केली जात होती. पंतप्रधानांनी आपल्या जनसभांमध्ये दहशतवाद्यांना व त्यांच्या पाठिराख्यांना धडा शिकविला जाईल, अशी ग्वाही दिली होती. तसेच त्यासाठी फार वेळ घेतला जाणार नाही, असे संकेत पंतप्रधानांनी दिले होते. मंगळवारी झालेल्या हवाई हल्ल्यानंतर राजस्थान येथील आपल्या सभेत व नवी दिल्लीतील कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी थेट उल्लेख न करता हवाई हल्ल्याचा अप्रत्यक्ष दाखला दिला.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info