पाकिस्तानचे दुःसाहस – भारतावर हवाई हल्ला चढविला

पाकिस्तानचे दुःसाहस – भारतावर हवाई हल्ला चढविला

‘एफ-१६’ पाडून वायुसेनेने हल्ला उधळला हवाई चकमकीत वायुसेनेचे ‘मिग-२१’ कोसळले – भारताचा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात

नवी दिल्ली/इस्लामाबाद – भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले चढविल्यानंतर, भारताच्या लष्करी ठिकाणांवर आक्रमण करून पाकिस्तानने भारताबरोबर युद्धाची घोषणाच केल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत घुसून लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या ‘मिग-२१’ विमानांनी पाठलाग करून पाकिस्तानच्या विमानांना माघार घेण्यास भाग पाडले. यावेळी झालेल्या हवाई चकमकीत भारताला आपले ‘मिग-२१’ विमान गमवावे लागले. त्याचवेळी पाकिस्तानचे घुसखोर ‘एफ-१६’ पाडण्यात हवाई दलाला यश मिळाले. पाकिस्तानने ही कारवाई करून भारताला खुले आव्हान दिले आहे. यानंतर भारतात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची नवी लाट उसळली आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी पत्रकार परिषद संबोधित करून पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याची अधिकृत पातळीवर माहिती दिली. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला चढविला होता. यात पाकिस्तानचे नागरी किंवा लष्करी नुकसान झाले नव्हते. पण पाकिस्तानने मात्र भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले चढविण्याचा प्रयत्न केला, हे आक्रमणच ठरते, असे रविश कुमार यांनी बजावले. या चकमकीत भारताचे ‘मिग-२१ बायसन’ विमान कोसळल्याची माहितीही रविश कुमार यांनी दिली. सदर विमानाचा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात आहे. या जखमी वैमानिकाचे पाकिस्तानने आपल्या माध्यमांसमोर प्रदर्शन केले असून हे आपल्याला भारताविरोधात मिळालेले फार मोठे यश असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र भारतीय वैमानिकाला मिळत असलेली ही वागणूक म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन ठरते, या वैमानिकाला कुठलीही इजा न करता ताबडतोब भारताच्या स्वाधीन करण्यात यावे, अशी मागणी भारताने केली आहे.

सदर हल्ल्याप्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांकडे जळजळीत शब्दात निषेध नोंदविला. तसेच पाकिस्तानने भारतावर केलेल्या या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह तिन्ही संरक्षणदलांच्या प्रमुखांची भेट घेतली. याबरोबरच देशातील राजकीय पक्षांची विशेष बैठक संपन्न झाली असून या बैठकीत पाकिस्तानचा एकमुखाने निषेध नोंदविण्यात आला. तसेच वायुसेनेने गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या संरक्षणासाठी केलेल्या कामगिरीचीही या बैठकीत प्रशंसा करण्यात आली. भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करून आव्हान देणार्‍या पाकिस्तानने आता शांततेची भाषा सुरू केली आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने एकाच दिवसात अनेक कोलांट्याउड्या मारल्या. पाकिस्तानने आपली क्षमता सिद्ध करून भारताला उत्तर दिले, अशी फुशारकी पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी मारली. यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या लढाऊ विमानांची कारवाई भारताची हानी करण्यासाठी नव्हती, अशी सारवासारव केली. त्याचवेळी भारताला शांततेचा सल्ला देऊन वाटाघाटी सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. ‘युद्ध सुरू करणे सोपे असते, पण त्याचा शेवट कसा होईल, ते कुणाच्याही हातात असू शकत नाही’, असा धमकीचा सूर इम्रान खान यांनी लावला आहे. त्याचवेळी दोन्ही देशांकडी संहारक शस्त्रे आहेत, याची आठवण इम्रान खान यांनी करून दिली.

पाकिस्तानचे पंतप्रधान भारताला शांततेचा प्रस्ताव देत असताना, जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने मंगळवारपासून भीषण हल्ले सुरू केले आहेत. गोळीबार आणि मॉटर्सचा मारा करणार्‍या पाकिस्तानच्या लष्कराने रणगाड्यांच्या तोफांचाही वापर केल्याचे समोर येत आहे. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल कारवाई करून पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उडवून दिल्या आहेत. नियंत्रण रेषेवर घनघोर संघर्ष सुरू ठेवून पाकिस्तानकडून वापरली जाणारी शांततेची भाषा म्हणजे विनोद ठरतो, असे भारतीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. बुधवारी भारताने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याबाबत अधिक बोलण्याचे टाळले असले तरी भारताचे नेते सूचक शब्दात संदेश देत आहेत. अमेरिकेने पाकिस्तानच्या अ‍ॅबोटाबाद येथे घुसून जशी लष्करी कारवाई केली, तशीच कारवाई करण्याची क्षमता भारताकडेही आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. पाकिस्तानबरोबर संघर्ष सुरू असताना, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेले हे विधान भारताच्या आक्रमक धोरणांची साक्ष देत आहे.  दरम्यान, पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात ‘जैश’चा सहभाग असल्याचे सबळ पुरावे पाकिस्तानने भारताकडे मागितले होते. यानुसार बुधवारी भारताने पाकिस्तानकडे हे पुरावे सुपूर्द केल्याची बातमी आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडे परराष्ट्र मंत्रालयाने या पुराव्यांचे ‘डॉसिअर’ दिले. या पुराव्यांवर पाकिस्तानने त्वरित आणि खात्रीलायक कारवाई करावी, अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली. तसेच सध्या चीनमध्ये सुरू असलेल्या रशिया-भारत-चीन’मधील त्रिपक्षीय चर्चेदरम्यान, भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानने ‘जैश’ला पुरविलेल्या संरक्षण व सहाय्यामुळेच ‘पुलवामा’चा हल्ला या दहशतवादी संघटनेला घडविता आला, याकडे स्वराज यांनी लक्ष वेधले. ‘जैश’वर कारवाई करण्याची आपली आंतरराष्ट्रीय जबाबदारी पाकिस्तानने पार पाडली नाहीच, उलट यासंदर्भात केल्या जाणार्‍या मागणीकडे पाकिस्तानने सतत दुर्लक्षच केले. म्हणूनच भारताला ‘बालाकोट’ येथे हल्ला चढवावा लागला, असे सांगून परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी या हल्ल्याचे समर्थन केले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info