‘प्रायव्हेट आर्मी’च्या तैनातीने अफगाणिस्तानचा प्रश्‍न सुटेल – ‘ब्लॅकवॉटर’चे प्रमुख एरिक प्रिन्स

वॉशिंग्टन – ‘अफगाणिस्तानातील प्रदीर्घ युद्ध संपविण्याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेला माझे पूर्ण समर्थन आहे. पण अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेऊन हे युद्ध संपणार नाही. तर अफगाणिस्तानात अमेरिकी सैनिकांच्या जागी हजारो कंत्राटी सैनिकांना तैनात करून अमेरिकेला आपली या संकटातून सुटका करता येईल’, असा प्रस्ताव ‘ब्लॅकवॉटर’ या प्रसिद्ध कंपनीचे प्रमुख ‘एरिक प्रिन्स’ यांनी दिला. यासाठी प्रिन्स यांनी व्हिएतनाममधील प्रसिद्ध ‘सैगन’ माघारीची आठवण करून दिली.

एका अरबी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एरिक प्रिन्स यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीबाबत केलेल्या घोषणेवर आपली प्रतिक्रिया दिली. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारात इराक, अफगाणिस्तानातील प्रदीर्घ युद्ध संपविण्याची घोषणा केली होती. अशी प्रदीर्घ युद्ध संपविण्याच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भूमिकेला माझेही समर्थन आहे. पण युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघार हा पर्याय योग्य ठरत नाही’, असे प्रिन्स म्हणाले.

‘अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली किंवा अफगाणिस्तानचे लष्करी सहाय्य काढून घेतले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल. १९७५ साली अमेरिकेने व्हिएतनामच्या सैगन शहरातून माघार घेतली तेव्हा हेलिकॉप्टर्समधून अमेरिकी सैनिक, राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांना व्हिएतनाममधून बाहेर काढावे लागले होते. तशीच वाईटस्थिती अफगाणिस्तानातील माघारीनंतरही निर्माण होईल’, असा इशारा ब्लॅकवॉटरचे प्रमुख एरिक प्रिन्स यांनी दिला. तसेच अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेण्याऐवजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वेगळ्या पर्यायाचा विचार करावा, असे प्रिन्स यांनी सुचविले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी कारवाईची सूत्रे कंत्राटी लष्कराला द्यावी, असे प्रिन्स यांनी अरबी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. अफगाणिस्तानात सध्या तैनात असलेल्या नाटोच्या सुमारे ५० हजार सैनिकांना माघारी घेतल्यानंतर त्यांच्या जागी सहा हजार कंत्राटी लष्कर आणि अमेरिकेच्या ‘स्पेशल फोर्सेस’चे दोन हजार जवान तैनात करावे, अशी योजना प्रिन्स यांनी मांडली. हा निर्णय घेतला तर दरवर्षी अफगाण युद्धावर होणार्‍या खर्चात ३० अब्ज डॉलर्सची कपात होईल, असा दावा ब्लॅकवॉटरच्या प्रमुखांनी केला.

प्रिन्स यांनी यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सैन्यमाघारीच्या घोषणकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे लक्ष वेधले. २०१३ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी अफगाणिस्तानातून ३४ हजार सैनिकांना माघारी घेण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली होती, याची आठवण प्रिन्स यांनी करून दिली. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेण्याआधी या ठिकाणी कंत्राटी लष्कर तैनात करावे, असे प्रिन्स यांनी सुचविले.

पेंटॅगॉनने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अफगाण युद्धासाठी दरवर्षी ४५ अब्ज डॉलर्सचा खर्च येतो. त्यामुळे प्रिन्स यांचा कंत्राटी लष्कराचा प्रस्ताव अमेरिकी अर्थव्यवस्थेवरील भार कमी करणारा ठरू शकतो. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली होती. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या माघारीचे वेळापत्रक जाहीर केले नव्हते. तसेच याबाबतचे आदेश अमेरिकेच्या संरक्षणदलांना दिलेले नाहीत. तालिबानबरोबर अमेरिकेच्या वाटाघाटींच्या यशापयशावर ही सैन्यमाघार अवलंबून होती. मात्र अमेरिकेच्या या वाटाघाटी फिस्कटल्या असून तालिबानने अमेरिकेच्या मागण्या मान्य करण्यास ठामपणे नकार दिल्याचे उघड होत आहे.

याला काही तास उलटत नाही तोच एरिक प्रिन्स यांनी अफगाणिस्तानसाठी आपल्या ‘ब्लॅकवॉटर्स’ची सेवा उपलब्ध असल्याचा प्रस्ताव दिला. याआधी सिरियातून अमेरिकेच्या सैन्यमाघारीबाबत बोलतानाही एरिक प्रिन्स यांनी असाच प्रस्ताव दिला होता.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info