‘मिशन शक्ती’च्या यशानेे भारत ‘अंतरिक्ष महाशक्ती’ बनला – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली – ‘भारत अंतरिक्ष महाशक्ती बनला आहे’, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. अंतराळात ३०० किलोमीटरवर असलेला उपग्रह भेदून भारताने आपल्या ताफ्यात उपग्रहभेदी क्षेपणास्त्र आल्याचे सांगून पंतप्रधानांनी हा देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे घोषित केले. ‘मिशन शक्ती’ असे नाव असलेली ही अत्यंत अवघड मोहीम भारतीय वैज्ञानिकांनी अवघ्या तीन मिनिटांमध्ये पूर्ण केली. या यशामुळे अमेरिका, रशिया व चीन या देशानंतर उपग्रह भेदण्याची क्षमता असलेला भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. मात्र भारताची ही क्षमता केवळ संरक्षणासाठी वापरली जाईल, याद्वारे शस्त्रस्पर्धा पेटविणे हा काही भारताचा हेतू नाही, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दिला आहे.

२००७ साली चीनने आपलाच उपग्रह भेदून सार्‍या जगाला धक्का दिला होता. अंतराळात ८६५ किलोमीटर उंचीवरील असलेला हा उपग्रह भेदून चीनने शस्त्रस्पर्धा सुरू केल्याचे आरोप झाले होते. यामुळे भारतीय उपग्रहांची सुरक्षा धोक्यात आल्याचे दावे केले जात होते. पण बुधवारी पंतप्रधान मोदी यांनी भारताकडेही उपग्रहभेदी क्षेपणास्त्र आल्याची घोषणा करून काही वेळापूर्वीच याची यशस्वी चाचणी पार पडल्याचे जाहीर केले. ही सार्‍या देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे उपग्रहभेदी क्षेपणास्त्र अर्थात अँटी सॅटेलाईट मिसाईल – एसॅट भारतातच विकसित करण्यात आले व यासाठी ‘डीआरडीओ’च्या संशोधकांनी अफाट परिश्रम केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये उपग्रहांचा वापर सुरू झाला असून कृषी, शिक्षण, आपत्ती निवारण, हवामान आणि सुरक्षा अशा अनेक क्षेत्रांसाठी उपग्रहांचा वापर केला जातो. म्हणूनच उपग्रहांच्या सुरक्षेसाठी भारताने प्राप्त केलेली ही क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते, असा दावा पंतप्रधानांनी केला.

भारताने ‘लोअर अर्थ ऑरबिट’मध्ये ही चाचणी केली असून याने आंतराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन झालेले नाही. यातून शस्त्रस्पर्धा भडकवण्याचा भारताचा हेतू नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दिली. भारताचा शांततेवर विश्‍वास आहे व भारत शस्त्रस्पर्धेच्या विरोधात आहे आणि यापुढेही भारताची ही भूमिका कायम असेल, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. दरम्यान, डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी या चाचणीमुळे देशाच्या क्षमतेत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे सांगून त्यावर आनंद व्यक्त केला. तर या क्षेत्रातील जाणकार सदर उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी म्हणजे अणुचाचणीइतकी महत्त्वाची घटना ठरते, असा दावा करीत आहेत. भारतावर हेरगिरी करणारे उपग्रह यापुढे भेदले जाऊ शकतात, असे सांगून यामुळे देशाची सुरक्षा अधिक भक्क्कम होणार असल्याचे दावे तज्ज्ञांनी केले आहेत.

या यशासाठी देशाच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करीत असताना, सरकारने दाखविलेल्या इच्छाशक्तीचीही प्रशंसा होत आहे. दोन वर्षांपूर्वी मिशन शक्तीची तयारी सुरू झाली होती, अशी माहिती समोर येत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info