आर्क्टिक क्षेत्रात रशियाचा नवा लष्करी तळ कार्यान्वित

आर्क्टिक क्षेत्रात रशियाचा नवा लष्करी तळ कार्यान्वित

मॉस्को – रशियाने आर्क्टिक  क्षेत्रातील आपला प्रभाव वाढविण्यासाठी आक्रमक पावले उचलली असून नुकताच एक नवा लष्करी तळ सक्रिय केल्याचे समोर आले आहे. ‘सेव्हर्नी क्लेव्हर’ नावाच्या या तळावर २५०हून अधिक सैनिकांसह ‘मिसाईल डिफेन्स सिस्टिम’ व ‘अँटी शिप मिसाईल्स’ तैनात करण्यात आली आहेत. रशियाकडून आर्क्टिकमध्ये जोरदार तयारी सुरू असतानाच कॅनडा या क्षेत्रावरील अधिकार गमावू शकेल, असा इशारा कॅनडातील संसद सदस्यांनी दिला आहे.

पृथ्वीच्या उत्तर टोकाला असलेल्या ‘आर्क्टिक’मधील महत्त्वाचा सागरी दळणवळण मार्ग म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘कॉटल्नी आयलंड’वर नवा तळ उभारण्यात आला आहे. या तळाच्या माध्यमातून भविष्यात आर्क्टिकमध्ये विकसित होणार्‍या व्यापारी मार्गावर नियंत्रण मिळविणे हा हेतू असल्याचे सांगण्यात येते. ‘आमच्याकडे हवाईक्षेत्र व नॉर्दन सीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे’, अशी माहिती या तळाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल व्लादिमिर पॅसेक्निक यांनी दिली.

रशियाने या तळावर पूर्ण आर्क्टिक क्षेत्रावर नजर ठेवता येईल, अशी रडार यंत्रणा तसेच ‘कोस्टल डिफेन्स मिसाईल सिस्टिम’ व ‘पँटसिर’ ही हवाईभेदी क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. त्याचवेळी तळावर तैनात २५० सैनिकांना तब्बल एक वर्ष पुरेल इतका जीवनावश्यक सामुग्रीचा साठाही करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरून कोणतीही मदत मिळाली नाही तरी तब्बल एक वर्षे हा तळ सहजगत्या कार्यरत राहिल, असा दावा रशियन अधिकार्‍यांनी केला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी स्वतः ‘आर्क्टिक’ क्षेत्र देशाच्या भविष्यात महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल, असे संकेत देऊन या भागातील लष्करी तैनाती तसेच गुंतवणूक वाढविण्याचे संकेत दिले होते. त्यासाठी ‘फार ईस्ट अ‍ॅण्ड आर्क्टिक डेव्हलपमेंट’ नावाने स्वतंत्र विभागही स्थापन करण्यात आला. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत रशियन संरक्षणदलांच्या आर्क्टिकमधील हालचाली वाढविण्यात आला असून ‘सेव्हर्नी क्लेव्हर’सह तीन संरक्षणतळ कार्यान्वित करण्यात आले आहेत.

या वर्षाच्या अखेरीस रशिया आर्क्टिक क्षेत्रात मोठा युद्धसराव आयोजित करणार असून त्याला ‘टीसेंटर-२०१९’ असे नाव देण्यात आले आहे. यात रशियाच्या ‘नॉर्दन फ्लीट’, पॅसिफिक फ्लीट’सह ‘सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्ट’मधील हजारो सैनिक सहभागी होणार आहेत. हा सराव ‘आर्क्टिक’मध्ये तैनात लष्करी तुकड्यांची युद्धाची तयारी पाहण्यासाठी आयोजित करण्यात आला असल्याचे रशियन सूत्रांनी स्पष्ट केले. यात रशियाकडून खास बर्फाळ भागासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध संरक्षणयंत्रणांचीही चाचणी घेण्यात येणार आहे.

रशियाकडून होणार्‍या या वेगवान हालचालींच्या तुलनेत आर्क्टिकवर दावा सांगणारे इतर देश मागे पडत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेने आर्क्टिकचा भाग असलेल्या अलास्कामधील तळ पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले असले तरी त्यासंदर्भातील तयारी पूर्ण झालेली नाही. कॅनडाचेही आर्क्टिककडे दुर्लक्ष झाल्याचे समोर येत असून देशातील संसद सदस्यांकडून या मुद्यावर सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्या वर्षी नाटोने ‘नॉर्वे’त सराव आयोजित करून आर्क्टिकवर योग्य लक्ष ठेवण्याचे संकेत दिले असले, तरी पुढे पावले उचललेली नाहीत. त्यामुळे आर्क्टिकच्या वर्चस्वासाठी सुरू झालेल्या स्पर्धेत रशिया बाजी मारेल, असे संकेत   विश्‍लेषकांकडून देण्यात येत आहेत.

आर्क्टिकसाठी रशियाचे भारताशी सहकार्य

नवा लष्करी तळ कार्यान्वित करून रशिया या क्षेत्रावरील आपले वर्चस्व प्रस्थापित करीत असताना, इथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी इतर देशांबरोबर सहकार्य सुरू करण्याची तयारी केली आहे. रशियाचा निकटतम मित्रदेश असलेला भारत यात आघाडीवर असून नुकतीच भारताच्या परराष्ट्र सचिवांनी रशियाला दिलेल्या भेटीत ‘आर्क्टिक’बाबत प्रामुख्याने चर्चा पार पडली. ‘आर्क्टिक’च्या विकासासाठी रशिया करीत असलेल्या प्रयत्नांना भारत सहाय्य करणार असून यासाठी भारत मोठे योगदान देणार असल्याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली होती.

 

English हिंदी

 

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info