इस्लामाबाद – अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस अब्राहम लिंकन’ अरबी समुद्रात दाखल झाली आहे. इराणकडून अमेरिकेच्या हितसंबंधांना असलेला धोका लक्षात घेऊन या युद्धनौकेची तैनाती करण्यात आल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. मात्र ‘युएसएस लिंकन’च्या अरबी समुद्रातील प्रवेशामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. ही तैनाती इराणविरोधी नाही, तर त्याचे लक्ष्य पाकिस्तान असू शकते, असा संशय पाकिस्तानचे विश्लेषक व्यक्त करीत आहेत. चीन विकसित करीत असलेले पाकिस्तानचे ‘ग्वादर’ हे बंदर अमेरिकेच्या निशाण्यावर असून याद्वारे पाकिस्तानसह चीनलाही धक्का देण्यासाठी अमेरिकेने हालचाली सुरू केल्याची भीती या विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
सध्या अफगाणिस्तानात फार मोठ्या घडामोडी सुरू असून तालिबानने अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्याचे भयंकर सत्र सुरू केले आहे. यामुळे अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याची तयारी करीत असलेल्या अमेरिकेसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. तालिबानच्या या आक्रमकतेमागे पाकिस्तान असल्याचा आरोप अमेरिकी लष्करी अधिकारी व विश्लेषक सातत्याने करीत आले आहेत. ट्रम्प प्रशासन हे आरोप अत्यंत गांभीर्याने घेत आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेने या देशातील तालिबानच्या तळांवर हल्ले चढवावे, अशी मागणी मिशेल रुबिन या अमेरिकी विश्लेषकांनी केली आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्ध जिंकण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानात हल्ले चढवावेच लागतील, याची परखड जाणीव रुबिन यांनी करून दिली.
या पार्श्वभूमीवर, ‘युएसएस अब्राहम लिंकन’ अरबी समुद्रात दाखल झाली आहे. या युद्धनौकेवर सुमारे ९० लढाऊ विमाने व ३२०० नौसैनिक तैनात आहेत. या युद्धनौकेकडे शत्रूपक्षावर जबरदस्त मारा करण्याची क्षमता असून सदर युद्धनौकेसोबत पाच विनाशिका व एका पाणबुडीचा ताफा आहे. ही तैनाती इराणपासून असलेला धोका लक्षात घेऊन करण्यात आल्याचे दावे अमेरिका करीत आहे. त्याचवेळी आपल्याला इराणबरोबर युद्ध अपेक्षित नाही, असा खुलासाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे. पाकिस्तानचे विश्लेषकही अमेरिका इराणवर हल्ला चढवणार नाही, असे छातीठोकपणे सांगत आहेत. तसेच इस्रायलदेखील इराणवर हल्ला चढविण्याचा विचार करीत नसल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.
असे असताना, ‘युएसएस अब्राहम लिंकन’ची तैनाती पाकिस्ताननजिकच्या सागरी क्षेत्रात केली जात आहे. याचे कारण अगदी उघड असून पाकिस्तानलाच लक्ष्य करण्याचे हेतू त्यामागे असल्याची चिंता या विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. चीन विकसित करीत असलेले ‘ग्वादर’ बंदर अमेरिका लक्ष्य करू शकते. यामुळे एकाच वेळी पाकिस्तान व चीनला धक्का बसेल. तसेच दोन्ही देशांमध्ये विकसित होत असलेला ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ प्रकल्प अमेरिकेला मान्य नाही व ग्वादर बंदराला या प्रकल्पात अत्यंत महत्वाचे स्थान आहे, ही बाब देखील पाकिस्तानी विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.
इतकेच नाही तर अमेरिका पाकिस्तानला रोखण्यासाठी भारताचा वापर करील, या चिंतेने पाकिस्तानच्या विश्लेषकांची घाबरगुंडी उडाली आहे. भारत व अमेरिकेमधल्या सामरिक सहकार्याचे प्रमुख उद्दिष्ट पाकिस्तान व चीनला रोखणे हेच आहे, असे सांगून हे दोन्ही देश लवकरच पाकिस्तान व चीनसमोर आव्हान उभे करतील, असा इशारा पाकिस्तानचे पत्रकार देऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘युएसएस अब्राहम लिंकन’सारख्या अजस्र युद्धनौकेच्या अरबी समुद्रातील तैनातीने पाकिस्तानला धडकी भरल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |