बर्लिन/पॅरिस, दि. २५ (वृत्तसंस्था) – युरोपिय महासंघात ‘फ्रान्स-जर्मनी’ अशी कोणतीही आघाडी नसून उलट फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून युरोपिय लोकशाही उद्ध्वस्त करण्याच्या कारवाया सुरू आहेत, अशी घणाघाती टीका जर्मन नेत्यांनी केली. युरोपिय संसदेच्या निवडणुकीनंतर महासंघातील प्रमुख पदांची निवड लवकरच होणार असून त्यात फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी जर्मन उमेदवाराच्या निवडीत घातलेला खोडा व वादग्रस्त वक्तव्यांमुळे जर्मनीच्या राजकीय वर्तुळातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यामुळे नजिकच्या काळात महासंघातील आघाडीच्या देशांमध्येच संघर्ष सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.
युरोपियन संसदेच्या निवडणुकांमध्ये ‘ईपीपी’ नावाने ओळखण्यात येणार्या गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. जर्मनीचे ‘मॅन्फ्रेड वेबर’ या गटाचे नेते असून त्यांची युरोपियन कमिशनचे प्रमुख म्हणून निवड नक्की मानली जात होती. आतापर्यंतच्या महासंघाच्या परंपरेनुसार संसदेत सर्वाधिक जागा मिळविणार्या गटाचे नेते प्रमुख म्हणून निवडले जातात. निवडणुकीच्या निकालानंतर होणार्या २८ सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत त्याची निवड होते.
या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात ब्रुसेल्समध्ये झालेल्या बैठकीत जर्मन नेते वेबर यांची निवड अपेक्षित होती. सध्या महासंघातील प्रमुख व आघाडीचा देश असणार्या जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी वेबर यांना समर्थन दिले आहे. मर्केल व मॅक्रॉन यांच्यातील जवळिकीचा विचार करता वेबर यांची निवड होणारच, असे मानले जात होते. मात्र ब्रुसेल्समध्ये झालेल्या बैठकीत मॅक्रॉन यांनी वेबर यांच्या निवडीला विरोध केला.
त्यामुळे वेबर यांची निवड पुढे ढकलली गेली असून त्याचबरोबर महासंघातील इतर प्रमुख पदांची नियुक्तीही रखडली आहे. महासंघाचे प्रमुख म्हणून उमेदवारी घोषित केलेल्या वेबर यांनी एका मुलाखतीत मॅक्रॉन यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘सध्या इतरांकडून जे काही प्रस्ताव समोर येत आहेत, त्यांची संभावना विनाशकारी अशीच करता येईल. महासंघाला लवकरच मोठ्या संकटाच्या काळात प्रवेश करावा लागणार आहे’, अशा शब्दात वेबर यांनी मॅक्रॉन यांच्यावर टीकास्त्र सोडले.
महासंघातील पदांच्या निवडीबाबत जर्मनी व फ्रान्समध्ये टोकाचा तणाव निर्माण होण्याची ही पहिलीच घटना मानली जाते. या घटनेने गेल्या काही वर्षात जर्मनी व फ्रान्समध्ये निर्माण झालेल्या जवळिकीवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षात महासंघ तुटण्याचे इशारे दिले जात असताना या दोन प्रमुख देशांनी केलेली आघाडी व एकजुटीसाठी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली होती. मात्र त्यांच्यात सुरू झालेला संघर्ष महासंघाच्या भवितव्यालाही अडचणीत आणणारा ठरु शकेल, असे संकेत विश्लेषकांकडून देण्यात येत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |