वॉशिंग्टन/बीजिंग – तैवानला शस्त्रे पुरवून अमेरिकेने चीनला आपला शत्रू बनवू नये, असा इशारा चीनने दिला होता. याला उत्तर देताना अमेरिकेने तैवानबरोबरचे सहकार्य सुरू राहणार असल्याचे ठणकावले. तसेच ‘अमेरिका तैवानला देत असलेल्या लष्करी सहाय्यामुळे या क्षेत्रातील लष्करी समतोलावर प्रभाव पडणार नाही. या लष्करी सहाय्यामुळे सध्याच्या आणि भविष्यातील क्षेत्रीय धोक्याला सामोरे जाण्याची तैवानची क्षमता व तैवानची अंतर्गत सुरक्षा मजबूत होईल’, असा टोला अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने लगावला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानसाठी जाहीर केलेल्या संरक्षण सहाय्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तैवानसाठी २.२ अब्ज डॉलर्सचे शस्त्रसहाय्य मंजूर केले असून याअंतर्गत १०८ अॅबरॅम्स रणगाडे, २५० विमानभेदी स्टिंगर क्षेपणास्त्रे आणि यासंबंधी साहित्य व तंत्रज्ञान पुरविण्यात येणार आहे. तैवानसाठी जाहीर केलेल्या या शस्त्रसहाय्याची माहिती अमेरिकन काँग्रेसला देण्यात आली असून पुढच्या दोन महिन्यात यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले.
अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने संताप व्यक्त केला. चीनचे उपपरराष्ट्रमंत्री ‘ली युचेंग’ यांनी बीजिंगमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय बैठकीत अमेरिकेला धमकावले. ‘तैवानबरोबर सहकार्य प्रस्थापित करून तुम्ही चीनबरोबर शत्रुत्व घेत आहात. याचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी युचेंग यांनी दिली. चीनच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी उघडपणे अमेरिकेचा उल्लेख टाळला असला तरी ट्रम्प प्रशासनाने तैवानसाठी २.२ अब्ज डॉलर्सचे शस्त्रसहाय्य जाहीर केल्यानंतर चीनकडून ही प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी अमेरिकेला ‘वन चायना पॉलिसी’ची आठवण करून दिली. अमेरिकेने ‘वन चायना पॉलिसी’चा आदर करावा, असे आवाहन शुआंग यांनी केले. तसेच ‘तैवान हा चीनचा अविभाज्य भूभाग असून येथील प्रशासनाबरोबरचे सहकार्य चीनचे सार्वभौमत्व व सुरक्षेला आव्हान देणारे असेल’, अशा शब्दात शुआंग यांनी अमेरिकेवर टीका केली.
पण अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने तैवानबरोबरच्या लष्करी सहकार्याचे समर्थन केले. अमेरिका व तैवानमधील लष्करी सहकार्यामुळे या क्षेत्रातील लष्करी समतोल प्रभावित होणार नसल्याचा दावा पेंटॅगॉनने केला. त्याचबरोबर या सहकार्यामुळे तैवानच्या लष्करी सामर्थ्यात वाढ होईल. वर्तमान आणि भविष्यकाळातील क्षेत्रीय धोक्यांचा सामना करण्यासाठी तैवानच्या लष्करी सामर्थ्यात वाढ होणे आवश्यक असल्याचे सांगून पेंटॅगॉनने या देशाला चीनकडूनच धोका असल्याची बाब अधोरेखित केली आहे.
तैवान हा ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील महत्त्वाचा सहकारी देश असल्याचे अमेरिकेने गेल्या महिन्यात जाहीर केले. तसेच ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील देशांच्या बैठकीत तैवानच्या नौदलाचा ध्वज फडकावून अमेरिकेने चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ला हादरा दिला होता. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तैवानबरोबरच्या राजकीय व लष्करी सहकार्याला विशेष महत्त्व दिले आहे.
दरम्यान, अमेरिका व तैवानमधील लष्करी सहकार्यावर आक्षेप घेऊन चीनने तैवानवर लष्करी दडपण वाढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात चीनची लढाऊ विमाने, विनाशिकांनी तैवानच्या सीमेजवळून गस्त घातली होती. तर तैवानने देखील चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या लष्करी सज्जतेत वाढ करण्याची घोषणा केली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |