इराणचा धोका वाढल्याने अमेरिका सौदीमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करणार

इराणचा धोका वाढल्याने अमेरिका सौदीमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करणार

वॉशिंग्टन – इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यांमुळे पर्शियन आखातातील निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका सौदी अरेबियामध्ये आणखी ५०० सैनिक तैनात करणार आहे. अमेरिकन काँग्रेसचा विरोध धुडकावून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प याची घोषणा करतील, अशी माहिती अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने दिली. काही दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आखातात एक हजार सैनिक रवाना करण्याचे जाहीर केले होते.

‘संयुक्त अरब अमिरात’चे (युएई) इंधनवाहू जहाज पर्शियन आखातातून बेपत्ता झाले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने आपल्या जहाजाचे अपहरण केले असावे, असे ‘युएई’चे म्हणणे आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘युएई’चा हा आरोप धुडकावला होता. पण गुरुवारी ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने परदेशी इंधनवाहू जहाजावर आपण कारवाई केल्याचे जाहीर करून खळबळ उडविली आहे. दोन कोटी बॅरेल्स इंधन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या जहाजासह १२ परदेशी कर्मचार्‍यांना देखील ताब्यात घेतल्याचे रिव्होल्युशनरी गार्ड्सने म्हटले आहे.

सदर जहाज कुठल्या देशाचे किंवा कुणाच्या मालकीचे आहे, याबाबतचे तपशील इराणने प्रसिद्ध केले नाही. पण आपली इंधनवाहतूक रोखली गेली तर पर्शियन आखातातून इंधनाची वाहतूक होऊ देणार नसल्याची धमकी इराण प्रत्यक्षात उतरवित असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत, पर्शियन आखातातून प्रवास करणार्‍या जहाजांच्या सुरक्षेसाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष सौदीमध्ये नव्या तैनातीची घोषणा करतील, अशी माहिती अमेरिकी वृत्तवाहिनीने दिली. अमेरिकी लष्कराच्या दोन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीच्या हवाल्याने सदर वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसिद्ध केली.

सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील ‘प्रिन्स सुल्तान’ हवाईतळावर अमेरिकेचे ५०० सैनिक तैनात करण्यात येतील. अमेरिकेची सौदीमधील ही तैनाती इराणसाठी इशारा ठरत असल्याचा दावा केला जातो. अमेरिकी सैनिकांचे छोटे पथक याआधीच या हवाईतळावर तैनात करण्यात आले आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून आपल्या मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने गेल्या महिन्यात ‘पॅट्रियॉट’ ही हवाईसुरक्षा यंत्रणा या तळावर तैनात केली होती.

पॅट्रियॉटच्या तैनातीबरोबर अमेरिकी लष्कर या हवाईतळावरील धावपट्टीच्या कामात गुंतलेले असून लवकरच या धावपट्टीचा लढाऊ विमानांसाठी वापर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा सौदीने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण याआधीच सौदीबरोबरच्या शस्त्रसहकार्याला विरोध करणार्‍या अमेरिकन काँग्रेसकडून सौदीतील या तैनातीवरही आक्षेप घेतला जाऊ शकतो, असे अमेरिकी माध्यमांचे म्हणणे आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या विरोधाची पर्वा न करता सौदीत सैनिक तैनात करू शकतील, अशी दाट शक्यता आहे. याआधी काँग्रेसचा विरोध डावलून ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला प्रगत शस्त्रास्त्रे पुरविण्याचा निर्णय घेतला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info