वॉशिंग्टन – पुरावे सापडले नसले तरी इराणनेच सौदीच्या इंधनप्रकल्पांवर हल्ले चढविल्याचे दिसते. त्यामुळे या हल्ल्यांना उत्तर देणारी कारवाई करण्याची तयारी झाली आहे’, अशा सूचक शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी कारवाईचा इशारा दिला. अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनीही राष्ट्राध्यक्षांना दुजोरा दिला आहे.
‘इराणच्या विरोधात अमेरिकेकडे सर्वच पर्याय उपलब्ध आहेत. मला नवा संघर्ष छेडायचा नाही, पण कधीकधी संघर्ष अनिवार्य बनतो. सौदीवर झालेला हल्ला फार मोठा होता आणि अशा हल्ल्याला त्याहून अधिक मोठ्या कारवाईने प्रत्युत्तर देणे भागच आहे’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. संरक्षणमंत्री एस्पर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नेमक्या शब्दात इराणवर लष्करी करवाई आवश्यक असल्याचे सांगून त्याचे समर्थन करीत असल्याचे दिसते.
संरक्षणमंत्री एस्पर यांनी आखातातील अस्थैर्यासाठी इराणच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला. सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पांवरील हल्ल्यांसाठी इराण जबाबदार असल्याचा थेट उल्लेख करण्याचे एस्पर यांनी टाळले. पण ‘इराणने पायदळी तुडविलेल्या आंतरराष्ट्रीय नियमांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे लष्कर आपल्या मित्रदेशांना सहकार्य करील’, असे सांगून अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी सौदीला सहाय्य करणार असल्याचे जाहीर केले. यासंबंधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पेंटॅगॉनच्या लष्करी अधिकार्यांबरोबर आपली चर्चा झाल्याची माहिती संरक्षणमंत्री एस्पर यांनी दिली.
तर संरक्षणमंत्री एस्पर यांनी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि संरक्षणमंत्री प्रिन्स मोहम्मद बिन सलमान तसेच इराकचे संरक्षणमंत्री नजाह अल-शेमारी यांच्याबरोबरही चर्चा केली. काही तासांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतःहून प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली होती. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ लवकरच सौदीसाठी रवाना होणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे.
प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देखील इंधनप्रकल्पांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपला देश सज्ज व सक्षम असल्याचे जाहीर केले होते. तर अमेरिकेकडून हल्ल्याचे इशारे मिळत असताना, इराणने अमेरिका व इस्रायलच्या विनाशिकांना जलसमाधी दिली जाईल, अशी धमकी दिली आहे. आखातातील या घडामोडींवर रशियाने चिंता व्यक्त केली आहे. सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे लष्करी कारवाईची शक्यता बळावल्याचा दावा रशियाच्या ‘फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिस’चे संचालक सर्जेई नॅरीश्कीन यांनी केला. पण चर्चेद्वारे हे संकट टाळण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन नॅरीश्कीन यांनी केले.
दरम्यान, इंधनप्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे सौदीच्या इंधन उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. पुढील महिनाभर तरी सौदीच्या इंधन उत्पादनात सुमारे तीस लाख बरेल्स प्रति दिन इतकी कपात होईल, अशी चिंता ‘एस एँड पी प्लॅट्स’ या अमेरिकी अभ्यासगटाने वर्तविली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |