चीनच्या वर्चस्वाला आव्हान देणार्‍या अमेरिकेच्या ‘रेअर अर्थ इनिशिएटिव्ह’मध्ये ऑस्ट्रेलियासह नऊ देश सहभागी

न्यूयॉर्क – उच्च तंत्रज्ञान व संरक्षण क्षेत्रासाठी लागणार्‍या ‘रेअर अर्थ मिनरल्स’मधील चीनचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या अमेरिकेच्या हालचालींना यश आले आहे. अमेरिकेने ‘रेअर अर्थ मिनरल्स’चे उत्पादन वाढविण्यासाठी नव्या खाणी शोधण्यावर तसेच प्रक्रियेसाठी नवे कारखाने उभारण्यावर भर देण्याचे संकेत दिले होते. त्याला ऑस्ट्रेलिया व ब्राझिलसह नऊ देशांनी होकार दिला आहे.

‘रेअर अर्थ इनिशिएटिव्ह’, आयात, माईक पॉम्पिओ, मिनरल्स, चर्चा, चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडाजून महिन्यात अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एक अहवाल संसदेला सादर केला होता. अहवालात ‘रेअर अर्थ मिनरल्स’संदर्भातील विविध शक्यता, पर्याय व प्रस्तावांचा उल्लेख होता. अमेरिकेला या संवेदनशील खनिजांची टंचाई भासू नये यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची गरज असून संबंधित कंपन्यांना आपत्कालिन साठा करण्याचे निर्देश द्यावे, असे सुचविण्यात आले होतेे. त्याचवेळी चीनव्यतिरिक्त इतर देशांचे पर्याय चाचपून पहावेत आणि मागणी पूर्ण करण्यासाठी वेगाने हालचाली कराव्यात, असे निर्देशही अहवालात देण्यात आले होते.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागासह इतर यंत्रणांनी यासाठी पुढाकार घेऊन विविध देशांशी चर्चा सुरू केली होती. अमेरिकेकडून सुरू झालेल्या या प्रयत्नांना यश आल्याचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जाहीर केले. पॉम्पिओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, बोटस्वाना, पेरु, अर्जेंटिना, डीआर काँगो, नामिबिआ, फिलिपाईन्स व झांबिया या देशांनी ‘रेअर अर्थ इनिशिएटिव्ह’मध्ये सहभागी होण्यास मान्यता दिली आहे.

‘रेअर अर्थ इनिशिएटिव्ह’, आयात, माईक पॉम्पिओ, मिनरल्स, चर्चा, चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडाया देशांना अमेरिका प्रगत तंत्रज्ञान व इतर सर्व प्रकारचे आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. लिथियम, कॉपर, कोबाल्ट यासारख्या खनिजांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या खाणी शोधण्यासाठी देशांना मदत पुरविण्यात येईल, असे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी सांगितले. पॉम्पिओ यांनी ‘रेअर अर्थ इनिशिएटिव्ह’साठी होकार देणार्‍या सर्व देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या या उपक्रमात कालांतराने कॅनडाही सहभागी होणार असून एका आघाडीच्या कॅनेडियन कंपनीने अमेरिकेत गुंतवणुकीचीही तयारी दर्शविली असल्याची माहिती देण्यात आली.

स्मार्टफोन, संगणक व इलेक्ट्रिक गाड्यांसाठी वापरण्यात येणार्‍या खनिजांचा सर्वात मोठा उत्पादक म्हणून चीन ओळखण्यात येतो. ‘रेअर अर्थ मिनरल्स’ नावाने ओळखण्यात येणार्‍या १७ खनिजांचे जगातील जवळपास ३० टक्क्यांहून अधिक साठे चीनकडे असल्याचा दावा करण्यात येतो. सध्या जगात उत्पादन होणार्‍या ‘रेअर अर्थ’ उत्पादनात चीनचा वाटा जवळपास ९५ टक्के आहे. तर अमेरिकेला लागणार्‍या ‘रेअर अर्थ’ खनिजांपैकी ८० टक्के आयात चीनकडून करण्यात येते.

या क्षेत्रातील आपल्या वर्चस्वाचा चीनने आजवर प्रभावीरित्या वापर केला होता. आपल्या विरोधात आक्रमक भूमिका घेणार्‍या अमेरिका व जपान या देशांना या दुर्मिळ खनिजांचा पुरवठा रोखण्याचे संकेत देऊन चीनने त्याची दखल घेण्यास भाग पाडले होते. पण आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘रेअर अर्थ मिनरल्स’चा मुद्दा महत्त्वाचा बनविला असून राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर त्यात कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट धोरण स्वीकारले आहे.

त्यासाठी अमेरिकेत सध्या कार्यरत असलेल्या कंपनीलाही अतिरिक्त सुविधा उभारण्यासाठी सहाय्य करण्याची तयारी सुरू आहे. मात्र चीनने ‘रेअर अर्थ मिनरल्स’चा वापर ‘निर्णायक शस्त्रा’सारखा केल्यास अमेरिकेतील संरक्षण व तंत्रज्ञान उद्योग अडचणीत येऊ शकतो, असे दावे केले जातात. मात्र चीनबरोबर व्यापार व गुंतवणूक युद्ध छेडत असताना, ट्रम्प प्रशासनाने चीनकडून वापरले जाऊ शकणारे हे ‘रेअर अर्थ मिनरल्स’चे शस्त्र बोथट करण्याची जोरदार तयारी केल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

मराठी English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info