वॉशिंग्टन – ‘सिरियामध्ये सुरू असलेल्या प्रदीर्घ युद्धातून माघार घेण्याची हीच वेळ आहे. यापुढे अमेरिकेचे सैनिक सिरियातील युद्धात सहभागी होणार नाहीत’, अशी घोषणा करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियातील सैन्यमाघारीच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले. तर सिरियातून सैन्यमाघार घेऊन अमेरिकेने आपला विश्वासघात केल्याची टीका सिरियातील कुर्द बंडखोरांनी केली.
रविवारी रात्री व्हाईट हाऊसने अमेरिका सिरियातून सैन्यमाघार घेत असल्याचे जाहीर केले होते. अमेरिकेच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात होते. सोमवारी सकाळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या या निर्णयामागील कारणे देऊन युरोपिय देशांवर तसेच अमेरिकेच्या आधीच्या नेतृत्वावर टीका केली. ‘अमेरिकेने ३० दिवसांसाठी सिरियामध्ये सैन्य उतरविले होते. पण गेल्या कित्येक वर्षांपासून अमेरिकेचे सैनिक कुठल्याही ध्येयाशिवाय सिरियामध्ये लढत आहेत’, असे ताशेरे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ओढले.
आपण अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतली तेव्हा ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी सिरियामध्ये हाहाकार माजविला होता. मात्र आपल्या प्रशासनानेच ‘आयएस’ची खिलाफत १०० टक्के मोडून काढल्याचा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केला. ‘‘या कारवाईत अमेरिकेने ‘आयएस’च्या हजारो दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. यातील बहुतांश दहशतवादी युरोपमधून सिरियात दाखल झाले होते. युरोपिय देशांनी या दहशतवाद्यांना ताब्यात घ्यावे, असा प्रस्ताव आपण दिला होता. पण अमेरिकेनेच या दहशतवाद्यांना कैद करून त्यावरील खर्च करीत रहावा, अशी युरोपिय देशांची अपेक्षा आहे. पण नाटो आणि युरोपिय देशांबरोबरच्या व्यापारात आर्थिक नुकसान सहन करणारा अमेरिका आता मात्र अधिक खर्चाचे ओझे सहन करणार नाही’, अशा शब्दात ट्रम्प यांनी युरोपिय देशांचा समाचार घेतला.
‘कुर्दांनी आमच्याबरोबर दहशतवादविरोधात युद्ध केले. पण त्या सहकार्यासाठी अमेरिकेने कुर्दांना मोठा आर्थिक तसेच लष्करी सहाय्यही पुरविले होते’, असे सांगून अमेरिका कुर्दांच्या सुरक्षेसाठी बांधिल नसल्याचे ट्रम्प म्हणाले. यापुढे ज्या युद्धात अमेरिकेचा लाभ असेल, अशाच युद्धात अमेरिका उतरेल आणि ते युद्ध जिंकेलही, अशा शब्दात ट्रम्प यांनी आपले इरादे स्पष्ट केले.
‘‘आता सिरियातील ‘आयएस’विरोधी युद्धाबाबत तुर्की, युरोप, सिरिया, इराण, इराक, रशिया आणि कुर्दांनी आवश्यक ती भूमिका स्वीकारावी. अमेरिका त्याकडे लक्ष देणार नाही. पण ज्याक्षणी अमेरिकेच्या सुरक्षेला या दहशतवाद्यांकडून धोका निर्माण होईल, त्याक्षणी अमेरिका जगभरात कुठेही या दहशतवाद्यांविरोधात युद्धात उतरेल आणि आपल्या विरोधात काही करण्याच्या आतच ‘आयएस’चा दहशतवाद्यांचा नायनाट करील’’, असा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सिरियातील सैन्यमाघारीनंतर सिरियातील कुर्दांनी अमेरिकेने विश्वासघात केल्याची टीका केली आहे. अमेरिकेच्या काही लोकप्रतिनिधींनीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध केला असून कुर्दांनी अमेरिकेला सहाय्य केले होते, याची आठवण करून दिली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |