यापुढे सिरियातील ‘आयएस’च्या कैद्यांची जबाबदारी आमची नाही – उत्तर सिरियातील कुर्द गटांचा इशारा

यापुढे सिरियातील ‘आयएस’च्या कैद्यांची जबाबदारी आमची नाही – उत्तर सिरियातील कुर्द गटांचा इशारा

दमास्कस, दि. १२ (वृत्तसंस्था) – उत्तर सिरियातील तुरुंगात असणारे १२ हजार ‘आयएस’ दहशतवादी व त्यांच्या परिवाराचा भाग असणारे ९० हजार ‘आयएस’ समर्थक यांची जबाबदारी यापुढे कुर्द संघटनांवर असणार नाही, असा सज्जड इशारा कुर्दांच्या नेतृत्त्वाखाली उभारण्यात आलेल्या ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’ने दिला. ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’चे प्रवक्ते मुस्तफा बाली यांनी, सध्या कुर्दांवर वंशसंहाराची टांगती तलवार असून आम्ही आमची सर्व शक्ती आमच्या लोकांना वाचविण्यावरच केंद्रित करणार आहोत, असेही कुर्दांच्या प्रवक्त्याने बजावले आहे.

तुर्कीने काही दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन पीस स्प्रिंग’ नावाने उत्तर सिरियात लष्करी कारवाई हाती घेतली आहे. कारवाईदरम्यान लढाऊ विमाने व रणगाड्यांच्या सहाय्याने जोरदार हल्ले सुरूही झाले असून ३००हून अधिक कुर्दांना मारल्याचे दावेही तुर्कीने केले आहेत. कुर्दांच्या नेतृत्त्वाखाली उभारण्यात आलेल्या ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’ व संलग्न संघटनांनी तुर्कीच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासही सुरुवात केली असून तुर्कीचे मोठे नुकसान झाल्याचा दावा मुस्तफा बाली यांनी केला.

मात्र हे प्रत्युत्तर देतानाच कुर्दांनी त्यांच्या ताब्यात असणार्‍या ‘आयएस’च्या दहशतवाद्यांना मोकळे सोडण्याचा मार्ग पर्याय म्हणून वापरण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेने गेल्या चार वर्षांमध्ये केलेल्या कारवाईत सिरियातील ‘आयएस’चे हजारो दहशतवादी पकडले होते. हे दहशतवादी कुर्दांच्या ताब्यात असलेल्या भागातील तुरुंगात ठेवण्यात आले आहेत. कुर्दांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुमारे १२ हजार ‘आयएस’ दहशतवादी तुरुंगात आहेत. त्याचवेळी या दहशतवाद्यांच्या कुटुंबाचा भाग तसेच ‘आयएस’चे समर्थक असणारे ९० हजार सदस्यही कुर्दांच्या ताब्यात आहेत.

कुर्दांनी आपले सर्व बळ तुर्कीच्या कारवाईविरोधात वापरण्याचा इशारा यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे तुरुंगाच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या लष्करी तुकड्या तुर्कांविरोधातील संघर्षासाठी वापरण्यात येतील, असे मानले जाते. असे झाल्यास ‘आयएस’च्या दहशतवाद्यांना मोकळे सोडण्यात येईल, असा इशारा ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’चे प्रवक्ते मुस्तफा बाली यांनी दिला. ‘आयएस’चे दहशतवादी आणि त्यांचे कुटुंबिय व समर्थक म्हणजे ‘डिटोनेटेड बॉम्ब्स’ असून ते कधीही फुटू शकतात, असेही बाली यांनी बजावले.

काही दिवसांपूर्वीच अमेरिका तसेच ब्रिटनच्या लष्करी अधिकार्‍यांनी कुर्दांच्या ताब्यातील ‘आयएस’ दहशतवाद्यांबाबत गंभीर इशारा दिला होता. ‘आयएस’चे ११ हजारांहून अधिक दहशतवादी सक्रिय झाल्यास या क्षेत्रातील ‘आयएस’चा प्रभाव पुन्हा वाढू शकतो, असे अधिकार्‍यांनी बजावले होते. हे दहशतवादी पुन्हा एकदा सिरियातील आपल्या सहकारी गटांच्या सहाय्याने संघर्ष सुरू करतील, अशी चिंताही अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

कुर्द संघटनांच्या ताब्यात असणार्‍या ‘आयएस’ दहशतवाद्यांमध्ये युरोपिय देशांचे नागरिकही असून त्यांना संबंधित देशांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र त्याकडे युरोपिय देशांनी दुर्लक्ष केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सर्व दहशतवाद्यांना युरोपच्या सीमेवर मोकळे सोडू, असे धमकावले होते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info