मालीतील भीषण दहशतवादी हल्ल्यात ५४ जवानांचा बळी – २०१९ सालातील सर्वात मोठा हल्ला

मालीतील भीषण दहशतवादी हल्ल्यात ५४ जवानांचा बळी – २०१९ सालातील सर्वात मोठा हल्ला

बमाको – मालीतील मेनाका प्रांतातील लष्करी तळावर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात तब्बल ५४ जवानांचा बळी गेला. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात ‘अल कायदा’ संलग्न दहशतवादी संघटनेने ‘इंदेलिमेन’मधील लष्करी तळावर तीन आत्मघाती स्फोट घडविले. मालीतील लष्करी तळावर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला ठरतो. याआधी ऑक्टोबर महिन्यात दहशतवाद्यांनी हल्ला चढवून मालीच्या सुमारे ४० जवानांचा बळी घेतला होता.

   

शुक्रवारी नायजरच्या सीमेला लागून असलेल्या मेनाका प्रांतातील लष्करी तळाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. ‘इंदेलिमेन’मधील लष्करी तळ हा नायजर सीमा व उत्तर मालीतील दहशतवादविरोधी मोहिमेसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या तळावरील हल्ला मालीसाठी मोठा धक्का ठरला आहे. मालीत सध्या अल कायदा व ‘आयएस’ या दोन्ही दहशतवादी संघटना सक्रिय असून ‘इंदेलिमेन’मधील हल्ला ‘अल कायदा’संलग्न गटाने घडविला असावा, असा संशय व्यक्त केला जातो.

‘इंदेलिमेन’मधील हल्ल्यात तीन दहशतवाद्यांनी लष्करी तळात घुसखोरी करून आत्मघाती स्फोट घडविले. स्फोटांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून जखमींची संख्याही मोठी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात बळी पडलेल्या जवानांच्या संख्येत वाढ होण्याची चिंता सूत्रांनी व्यक्त केली. हल्ल्यानंतर तळावर अतिरिक्त तैनाती करण्यात आली असून शोधमोहिमही राबविण्यात येत असल्याचे मालीच्या लष्कराने जाहीर केले. आफ्रिका खंडातील ‘साहेल क्षेत्र’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या देशांमध्ये दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे गेल्या वर्षभरात दिसून आले आहे. माली, नायजर, बुर्किना फासो यासारख्या देशांमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत असून त्यात लष्करी तळांना लक्ष्य करण्यात येत आहे.

दोन महिन्यांपूर्वी आफ्रिकी देशांनी एकत्र येऊन दहशतवादाविरोधातील मोहीम तीव्र करण्याचा व त्यासाठी तब्बल एक अब्ज डॉलर्सचा निधी उभा करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयात ‘जी५ साहेल फोर्स’मधील लष्करी तुकड्यांची संख्या वाढविणे, प्रशिक्षण तसेच अत्याधुनिक शस्त्रपुरवठा यांचाही समावेश होता. पण दहशतवादी संघटनांच्या हल्ल्यांवर त्याचा फरक पडला नसल्याचे सातत्याने होणारे हल्ले दाखवून देत आहेत.

दहशतवाद्यांकडून सतत होणार्‍या हल्ल्यांमुळे आफ्रिकी देशांच्या लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम होत असल्याचा दावा स्थानिक विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. हेच या दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष्य असावे, असे स्पष्ट संकेत मिळत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info