एर्दोगन यांच्या आदेशावरुन ‘आयएस’ने सिरियात कुर्दांवर हल्ले चढविले – ‘आयएस’च्या वरिष्ठ कमांडरची माहिती

एर्दोगन यांच्या आदेशावरुन ‘आयएस’ने सिरियात कुर्दांवर हल्ले चढविले – ‘आयएस’च्या वरिष्ठ कमांडरची माहिती

लंडन – ‘‘२०१४ साली ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी सिरियाच्या कोबानी शहरात चढविलेल्या दहशतवादी हल्ल्यांचे आदेश तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी दिले होते. ‘आयएस’चा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याने एर्दोगन यांच्या आदेशांचे पालन केले होते’’, अशी खळबळजनक माहिती बगदादीच्या विश्‍वासू सहकार्‍याने उघड केली. एर्दोगन आणि ‘आयएस’मधील हे सहकार्य अजूनही सुरू असल्याचा दावाही ‘आयएस’च्या कमांडरने केला, अशी बातमी लंडनस्थित एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली.

या वर्षी मार्च महिन्यात ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’च्या (एसडीएफ) बंडखोरांनी उत्तर सिरियात केलेल्या कारवाईत ‘आयएस’च्या काही दहशतवाद्यांना अटक केली होती. ‘आयएस’च्या या दहशतवाद्यांना सिरियन कुर्दांच्या नियंत्रणात असलेल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. यामध्ये ‘आयएस’चा प्रमुख बगदादीचा विश्‍वासू ‘ताहा अब्दुररहिम अब्दुल्लाह’ या दहशतवादी कमांडरचा देखील समावेश होता. सिरियन कुर्दांनी केलेल्या चौकशीत ताहा अब्दुल्लाह याने काही खळबळजनक खुलासे केले.

‘‘२०१४ साली ‘आयएस’ने सिरियात मोठ्या भूभागाचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी बगदादीला सूचना केली होती. सिरियाच्या उत्तरेकडील कोबानी या कुर्दांच्या शहरावर भीषण हल्ला चढविण्याचे आदेश एर्दोगन यांनी बगदादीला दिले होते. बगदादीने देखील संघटनेतील इतर कमांडर्सना न विचारता एर्दोगनच्या आदेशांचे पालन करण्याची सूचना केली’’, अशी माहिती ताहा अब्दुल्लाह याने दिली.

‘सिरियन राजधानी दमास्कसवर हल्ला चढविण्याचे आम्हा सर्वांसमोर ध्येय होते. दमास्कससाठी पेटणार्‍या युद्धाची आम्ही तयारीही केली होती. पण बगदादीने कोबानीवर हल्ल्याचे आदेश दिले. आम्ही विरोध केल्यानंतरही बगदादीच्या आदेशांमध्ये बदल झाला नाही. याचा परिणाम कोबानीवरील हल्ल्यात झाला. या हल्ल्यात ‘आयएस’ला मोठी जीवितहानी सहन करावी लागली’, अशी नाराजी ताहा अब्दुल्लाह याने व्यक्त केली.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन आणि ‘आयएस’मधील हे सहकार्य अजूनही सुरू असल्याचा दावा ताहा अब्दुल्लाहने केला. अमेरिकेच्या हल्ल्यात बगदादी ठार झाल्यानंतर ‘आयएस’च्या प्रमुखपदी ‘अब्दुल्लाह करदास’ ऊर्फ ‘हाकी अब्दुल्लाह’ उर्फ ‘अबु ओमर तुर्कमनी’ याची निवड करण्यात आली होती. अब्दुल्लाह करदास याचे तुर्कीबरोबर असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळेच त्याची ‘आयएस’च्या प्रमुखपदी निवड झाली, अशी माहिती ताहा अब्दुल्लाहने दिली. बगदादीच्या विश्‍वासू साथीदाराने दिलेल्या या माहितीवर तुर्कीने प्रतिक्रिया दिलेली नाही.

२०१४ साली सप्टेंबर महिन्यात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी कोबानीवर हल्ला चढविला होता. जवळपास सहा महिने ‘आयएस’चे दहशतवादी आणि कुर्दांमध्ये हा संघर्ष सुरू होता. या संघर्षात ‘आयएस’ने ३५० कुर्द गावांवर ताबा मिळविला. तर तीन लाखाहून अधिक कुर्दांनी कोबानीमधून पलायन केले. मार्च २०१५ साली कुर्दांनी ‘आयएस’च्या ताब्यातील सर्व गावांचा पुन्हा ताबा घेतला होता. ‘आयएस’वरील या कारवाईसाठी अमेरिकेने कुर्दांना सहाय्य केले होते. तर अमेरिकेच्या या सहाय्यावर तुर्कीने जोरदार टीकाही केली होती.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन आणि ‘आयएस’ दहशतवादी संघटनेत सहकार्य असल्याचे दावे याआधी सिरियन सरकारपासून, युरोपिय गुप्तचर यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून करण्यात आले होते. तुर्की ‘आयएस’च्या जखमी दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. तसेच तुर्की ‘आयएस’च्या सहाय्याने सिरियातील इंधनाची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी करीत असल्याचा आरोपही सिरियन मानवाधिकार संघटनांनी केला होता. तर तुर्कीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. मात्र बगदादीच्या विश्‍वासू साथीदाराने दिलेल्या माहितीनंतर पुन्हा एकदा तुर्कीच्या दहशतवादविरोधी मोहिमेकडे संशयाने पाहिले जात आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात तुर्कीने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या संघर्षावर सिरियन कुर्दांनी आक्षेप घेतला होता. सिरियन कुर्दांना लक्ष्य करण्यासाठी आणि आपल्या कैदेत असलेल्या ‘आयएस’च्या दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी तुर्कीने ही मोहीम छेडल्याचा ठपका कुर्दांनी ठेवला होता.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info