इस्रायलच्या हल्ल्यात ‘इस्लामिक जिहाद’चा कमांडर ठार झाल्यानंतर गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेटस्चा भडीमार

इस्रायलच्या हल्ल्यात ‘इस्लामिक जिहाद’चा कमांडर ठार झाल्यानंतर गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेटस्चा भडीमार

गाझा/जेरूसलेम – इस्रायलवर भीषण हल्ल्यांचा कट आखणार्‍या इराणसंलग्न ‘इस्लामिक जिहाद’च्या कमांडरला इस्रायलने हवाई हल्ल्यात ठार केले. यानंतर गाझापट्टीतून सलग सहा तास इस्रायलवर सुमारे १५० रॉकेट्सचे हल्ले झाले असून महामार्ग, नागरी वस्त्यांवर रॉकेट्स कोसळले आहेत. या हल्ल्यांची माहिती देऊन इस्रायलने गाझापट्टीतील दहशतवाद्यांच्या तळांवर नवे हल्ले चढविण्याची घोषणा इस्रायलने केली आहे.

 

मंगळवारी पहाटे इस्रायलने गाझा शहरातील ‘शेजैया’ भागात हवाई हल्ला चढविला. या हल्ल्यात ‘इस्लामिक जिहाद’चा नेता ‘बाहा अबू अल-अता’ ठार झाल्याची माहिती इस्रायली लष्कर आणि ‘शिन बेत’ या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेने दिली. या दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी मिळून ही कारवाई केली. ‘बाहा’ म्हणजे इराणसंलग्न ‘इस्लामिक जिहाद’चा गाझातील सर्वात मोठा नेता असून गेल्या काही महिन्यांमध्ये इस्रायलवर झालेल्या रॉकेट हल्ल्यांचे आदेश त्यानेच दिले होते.

त्याचबरोबर येत्या काळात इस्रायली शहरांना अधिक तीव्रतेच्या रॉकेट्सने लक्ष्य करण्याची योजना ‘बाहा’ने आखली होती, अशी माहिती इस्रायली लष्कराने दिली. इस्रायल आणि हमासमध्ये झालेली संघर्षबंदी मोडीत काढण्यासाठी ‘इस्लामिक जिहाद’कडून हे हल्ले चढविले जात होते. या हल्ल्यांसह इस्रायलला चिथावणी देऊन युद्ध भडकविण्याचा कट ‘बाहा’ने आखला होता. त्यामुळे ‘बाहा’ला संपवून इस्रायली लष्कराने इराणसंलग्न ‘इस्लामिक जिहाद’ला मोठा हादरा दिल्याचा दावा केला.

इस्रायली लष्कराच्या या कारवाईनंतर मंगळवार सकाळपासून गाझापट्टीतून १५० हून अधिक रॉकेट हल्ले चढविले आहेत. गाझाच्या सीमेजवळील एश्कोल, किसूफिम, एन हाश्‍लोशा, निरिम भागात रॉकेट्स कोसळले. तर इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने ६० रॉकेट्स भेदल्याचा दावाही इस्रायली लष्कराने केला. गाझापट्टीतून दीर्घ आणि लघू पल्ल्याच्या रॉकेट्सचा मारा झाला असून यामध्ये एक इस्रायली मूल जखमी झाले.

गाझापट्टीतून होणार्‍या या रॉकेट हल्ल्यांना इस्रायली लढाऊ विमानांनीही उत्तर देणे सुरू ठेवले आहे. मंगळवारी दुपारी इस्रायली ड्रोनने गाझातील दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य केले. इस्रायलवर रॉकेट हल्ल्याच्या तयारीत असलेल्या या गटावर चढविलेल्या हल्ल्यात एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. तर मंगळवारी उशीरा इस्रायली लढाऊ विमानांनी गाझावर हल्ले चढविले.

या कारवाईनंतर इस्रायलने त्रयस्थ व्यक्तीकडून हमाससाठी संदेश पाठविला आहे. गाझातील ‘इस्लामिक जिहाद’ला इस्रायल लक्ष्य करीत असून हमासने या संघर्षात पडू नये, असे बजावण्यात आल्याची माहिती इस्रायली लष्कराचे प्रवक्ते जॉनेथन कॉंरिकस यांनी दिली.

हमास व इस्लामिक जिहादकडून इस्रायलविरोधात युद्धाची घोषणा
गाझा – ‘‘इस्रायली लष्कराने ‘बाहा अबू अल-अता’ या आपल्या नेत्याला ठार केले असून ही युद्धाची घोषणा ठरते. यापुढील परिणामांसाठी इस्रायलच जबाबदार असेल’’, असा इशारा ‘इस्लामिक जिहाद’ने दिला. तर गाझापट्टीवरील हल्ल्यांना नक्की प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकी हमासने दिली.
‘‘‘अल-कुद्स ब्रिगेड’चा (इस्लामिक जिहाद) कमांडर बाहा अबू अल-अता याला ठार करून इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पॅलेस्टिनी जनतेच्या हक्कांवर हा हल्ला असून याचे भीषण परिणाम इस्रायलला भोगावे लागतील. आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ’’, असे ‘इस्लामिक जिहाद’चा वरिष्ठ नेता झियाद अल-नखाला याने जाहीर केले.
गाझावरील इस्रायलच्या हवाई कारवाईवर हमास आणि फताहने टीका केली. हमासने इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, सिरियन राजधानी दमास्कस येथेही ‘इस्लामिक जिहाद’च्या कमांडरच्या घरावर हवाई हल्ला झाला. या हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप सिरियाने केला आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info