बेकायदेशीररित्या अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान मिळविण्यासाठी पाकिस्तानच्या हालचाली – जर्मनीचा आरोप

बेकायदेशीररित्या अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान मिळविण्यासाठी पाकिस्तानच्या हालचाली – जर्मनीचा आरोप

बर्लिन  – गेल्या काही वर्षात पाकिस्तान बेकायदेशीररित्या अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान मिळविण्यासाठी जोरदार हालचाली करीत आहे, असा आरोप जर्मनीने केला आहे. अण्वस्त्र तंत्रज्ञानाबरोबरच जैविक व रासायनिक शस्त्रे मिळविण्याचेही प्रयत्न करण्यात असल्याचे जर्मन सरकारने आपल्या दाव्यात म्हटले आहे. जर्मनीतील संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ही माहिती उघड करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी जर्मनीची अंतर्गत गुप्तचर यंत्रणा ‘बीएफव्ही’ने आण्विक तंत्रज्ञानाच्या प्रसाराबाबत एक अहवाल सादर केला होता. या अहवालात पाकिस्तान अण्वस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक जर्मनी तसेच इतर पाश्‍चात्य देशांमधून मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. जर्मन गुप्तचर यंत्रणेने याबाबत गंभीर चिंता व्यक्त करून सदर प्रयत्न रोखण्याची आवश्यकता आहे, अशी सूचनाही केली होती.

याच अहवालात, पाकिस्तानने अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली नसल्याची जाणीव करून देण्यात आली होती. पाकिस्तानचे लष्कर भारताविरोधात व्यापक प्रमाणात अण्वस्त्रकार्यक्रम राबवित आहे, ही बाबही अधोरेखित करण्यात आली होती. पाकिस्तानकडे सध्या १३० ते १४० अण्वस्त्रे असून २०२५ सालापर्यंत ही संख्या २५० पर्यंत नेण्याची महत्त्वाकांक्षी योजना पाकिस्तानने आखली आहे, असा इशाराही जर्मनीची अंतर्गत गुप्तचर यंत्रणा ‘बीएफव्ही’ने दिला होता.
काही दिवसांपूर्वी जर्मन संसदेतील ‘लेफ्ट पार्टी’च्या सदस्यांनी जर्मन सरकारला अण्वस्त्र तंत्रज्ञानासह रासायनिक तसेच जैविक शस्त्रांबाबत इतर देशांकडून काय प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती विचारली होती. त्याला उत्तर देताना जर्मन सरकारने, पाकिस्तानने अशा प्रकारच्या प्रयत्नांना वेग दिल्याचे स्पष्ट केले होते. जर्मनीतील काही संसद सदस्यांनी पाकिस्तानकडून अण्वस्त्रांसाठी सुरू असलेल्या हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा देश विश्‍वासर्ह भागीदार नसल्याचा आरोप केला.

जर्मनीच्या संसदीय समितीच्या सदस्यांनी पाकिस्तानला देण्यात येणारे शस्त्रसहाय्य थांबवावे, अशीही मागणी केली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info