ब्रुसेल्स, दि. २१ (वृत्तसंस्था) – रशिया व चीनसारख्या शत्रूदेशांची प्रगत क्षेपणास्त्रे आणि हवाईसुरक्षा तसेच उपग्रहांना भेदण्यासाठी ‘लेझर सिस्टिम्स’सारख्या यंत्रणा सक्रिय करण्यात येत आहेत, अशा शब्दात नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी नाटोची अंतराळक्षेत्रातील ‘ऑपरेशनल कमांड’ कार्यरत झाल्याची घोषणा केली. बुधवारी ब्रुसेल्समध्ये पार पडलेल्या नाटो सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
गेल्या काही वर्षात अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स यासारखे आघाडीचे देश अंतराळक्षेत्रातील संभाव्य संघर्षाची जोरदार तयारी करीत असल्याचे दिसून आले होते. मात्र या आघाडीच्या देशांची तयारी सुरू असताना नाटोसारखी आघाडीची लष्करी संघटना याबाबत मागे राहिल्याचे उघड झाले होते. जुलै महिन्यात ब्रिटनमधील आघाडीचा अभ्यासगट असणार्या ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’ने (कॅथम हाऊस) यासंदर्भात अहवालही प्रसिद्ध केला होता.
अहवालात नाटोच्या विविध सदस्य देशांनी अवकाशात लष्करी उपग्रह सोडले असून त्यातील एखाद्या देशाच्या उपग्रहावर झालेला सायबरहल्ला नाटोच्या संपूर्ण यंत्रणेसाठी घातक ठरू शकतो, असा दावा करण्यात आला होता. या उपग्रहांवर नाटोचे नियंत्रण नसल्याची महत्त्वपूर्ण बाबही अहवालातून समोर आली होती. या अहवालावर नाटो सदस्य देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.
त्यानंतर नाटोने या मुद्यावर बैठक घेऊन स्वतंत्र ‘स्पेस पॉलिसी’ला मान्यता दिली होती. त्यात अंतराळातील वाढत्या शस्त्रस्पर्धेचा वेध घेऊन त्याच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात यावा, अशी योजना मांडण्यात आली होती. नाटोचे सदस्य देश असणार्या फ्रान्ससारख्या देशाने स्वतंत्र ‘स्पेस फोर्स’ची घोषणा करून आपले धोरण वेगळे असेल, असे संकेत दिले होते. फ्रान्सच्या या भूमिकेने कोंडीत सापडलेल्या नाटोने अखेर यावर ठोस भूमिका घेत अंतराळक्षेत्र ही भविष्यातील युद्धभूमी आहे, असे मान्य करून त्याच्यासाठी स्वतंत्र कमांडची घोषणा केली आहे.
या घोषणेनंतर नाटो सदस्य देश लगेच अंतराळात क्षेपणास्त्रे अथवा इतर यंत्रणा तैनात करणार नाहीत; मात्र त्यादृष्टीने पूर्ण शस्त्रसज्ज राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्टॉल्टनबर्ग यांनी स्पष्ट केले. यावेळी रशिया व चीनसारख्या देशांकडून विकसित करण्यात येत असलेल्या प्रगत क्षेपणास्त्रांचाही उल्लेख करण्यात आला. चीन व रशिया या दोन्ही देशांनी अंतराळातील युद्धासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केल्याचे यापूर्वीच समोर आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षभरात ‘स्पेस फोर्स’ व त्यापाठोपाठ ‘स्पेस कमांड’ला मान्यता दिली असून ही कमांड ‘युनिफाईड कॉम्बॅट कमांड’ असल्याचेही जाहीर केले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |