दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियासह रशियाला चिथावणी

दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियासह रशियाला चिथावणी

सेऊल – दक्षिण कोरियाने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेणार्‍या आपला शेजारी उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. दक्षिण कोरियाच्या वायुसेनेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये ‘एफ-३५’ विमानाने उत्तर कोरियाची ‘पँटसीर-एस१’ हवाई सुरक्षा यंत्रणा भेदल्याचे दाखविले आहे. सदर हवाई सुरक्षा यंत्रणा रशियन बनावटीची असल्यामुळे दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाबरोबरच रशियालाही चिथावणी दिल्याचे दिसत आहे.

गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाच्या वायुसेनेचा एक अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. दक्षिण कोरियाने अमेरिकेकडून नुकत्याच खरेदी केलेल्या ‘एफ-३५ए’ या अतिप्रगत स्टेल्थ लढाऊ विमानाची भरारी दाखविण्यात आली आहे. हवाई कसरतीनंतर दक्षिण कोरियन विमानाने उत्तर कोरियाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये उत्तर कोरियाच्या लष्करातील ‘हॉसाँग-१४’ ही आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा तसेच जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांची ‘२के१२ कब’ हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचे यात दाखविले आहे.

‘हॉसाँग-१४’ आणि ‘२के१२ कब’ हे दोन्ही उत्तर कोरियन बनावटीचे आहेत. यापैकी ‘हॉसाँग-१४’ क्षेपणास्त्र दहा हजार किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य भेदू शकते. याआधी उत्तर कोरियाने अमेरिकेच्या शहरांवर या क्षेपणास्त्रांचा हल्ला चढविण्याची धमकी दिली होती. त्यामुळे दक्षिण कोरियाने सदर क्षेपणास्त्र ‘एफ-३५ए’च्या निशाण्यावर ठेवल्याचे बोलले जाते. पण दक्षिण कोरियाने प्रसिद्ध केलेल्या अ‍ॅनिमेटेड व्हिडिओमध्ये ‘२के१२ कब’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा रशियन बनावटीची ‘पँटसीर-एस१’ असल्याचा दावा केला आहे.

रशियाने उत्तर कोरियाला ‘पँटसीर-एस१’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविलेली नाही. असे असताना दक्षिण कोरियाने सदर व्हिडिओमध्ये रशियन यंत्रणेचा उल्लेख करुन वेगळेच संकेत दिल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून रशियाने उत्तर कोरियाच्या बाजूने तर दक्षिण कोरियाला चिथावणी देणारी भूमिका स्वीकारली आहे. गेल्या महिन्यात चीनबरोबर हवाई सराव करणार्‍या रशियाच्या बॉम्बर्स विमानांनी दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर दक्षिण कोरियाने लढाऊ विमाने रवाना करून रशियन बॉम्बर्सना पिटाळले होते.

दरम्यान, दक्षिण कोरियाने अमेरिकेबरोबर ६० ‘एफ-३५ए’ लढाऊ विमानांचा करार केला असून यातील १३ विमाने राजधानी सेऊलमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिका व दक्षिण कोरियातील या करारावर उत्तर कोरियाने आक्षेप घेतला होता. सदर करार आपल्या सुरक्षेला आव्हान देणारा असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला होता.

हिंदी मराठी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info