Breaking News

सायप्रसवरील बंदी मागे घेऊन अमेरिकेचा तुर्कीला धक्का

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेने भूमध्य सागरी क्षेत्रातील महत्त्वाचा देश असणार्‍या सायप्रसवर १९८७ सालापासून टाकलेले शस्त्रास्त्रविषयक निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचा हा निर्णय तुर्कीसाठी जबरदस्त धक्का ठरला आहे. तुर्कीने तीव्र नाराजी व्यक्त करून हा निर्णय म्हणजे धोकादायक चिथावणी ठरेल, असा इशारा दिला आहे.

सायप्रसमधील ग्रीक व तुर्की वंशाच्या नागरिकांमधील संघर्ष थांबविण्यासाठी तसेच शस्त्रास्त्रस्पर्धा रोखण्यासाठी १९८७ साली अमेरिकेने निर्बंध लादले होते. पण अमेरिकेच्या संसदेने मंगळवारी ८६ विरुद्ध ८ मतांनी सायप्रसवरील निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला. निर्बंध मागे घेताना सदर निर्णय ग्रीस, इस्रायल व सायप्रसमधील सहकार्य भक्कम होण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा दावा अमेरिकेच्या संसद सदस्यांनी केला आहे.

  

सायप्रस हा युरोपिय महासंघाचा सदस्य असून ग्रीस व तुर्कीपासून भौगोलिकदृष्ट्या जवळ आहे. गेल्या काही वर्षात शेजारी देश असलेल्या ग्रीस व तुर्कीतील तणाव वाढला असून येत्या काळात दोन्ही देशांमध्ये संघर्षाचा भडका उडेल, असा इशारा लष्करी विश्‍लेषकांनी आठवड्यापूर्वी दिला होता. तुर्कीने लिबियाबरोबर केलेल्या सागरी क्षेत्रासंदर्भातील करार व सायप्रसवरून असलेला वाद हे या संघर्षाचे कारण असेल, असे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अमेरिकेने ग्रीसची बाजू घेऊन तुर्कीने लिबियन सरकारबरोबर केलेल्या करारावर टीका केली होती.

त्याचवेळी तुर्कीने अमेरिकेच्या विरोधात जाणारी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. रशियाकडून ‘एस-४००’ हवाई सुरक्षा यंत्रणेची खरेदी तसेच सिरियातील कुर्दावरील कारवाई, यावरुन तुर्कीने अमेरिका तसेच नाटोचा विरोध झुगारला आहे.

सायप्रसची दोन भागांमध्ये फाळणी झाली असून उत्तर सायप्रसवर तुर्कीचा ताबा आहे. तुर्की संपूर्ण सायप्रसवर आपला ताबा असल्याचा दावा करीत असून त्यासाठी लष्करी हालचालीही वाढवित आहे. अशा स्थितीत अमेरिकेने सायप्रसवरील निर्बंध उठवून शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू करून तुर्कीसमोर आव्हान उभे केले आहे. नजिकच्या काळात याचा फार मोठा ताण तुर्कीवर येऊ शकतो.

सध्या तुर्की सिरियातील कुर्दांच्या ठिकाणांवर हल्ले चढवित आहे. त्याचवेळी ग्रीसबरोबरील तुर्कीचे संबंध ताणलेले असून दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो, असे दावे केले जातात. अशा परिस्थितीत ग्रीसने अमेरिकेला लष्करी तळासाठी ‘ऑफर’ देऊन तुर्कीला चिथावणी दिली आहे.

या सार्‍या घडामोडी अमेरिका तुर्कीची कोंडी करीत असल्याचे संकेत देत असून पुढच्या काळात तुर्कीकडून याला प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता समोर येत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info