लिथुआनियामुळे ‘न्यूक्लिअर थर्ड वर्ल्ड वॉर’ भडकेल

- रशियाच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचा इशारा

माजी लष्करी

मॉस्को/किव्ह – ‘रशियाचा तळ असलेल्या कॅलिनिनग्रॅडमध्ये व्यापारी वस्तूंची निर्यात बंद करणे रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक बाब ठरते. अशा परिस्थितीत रशियाने कॅलिनिनग्रॅडमध्ये अण्वस्त्रे तैनात करावीत. लिथुआनियाबरोबरील तणाव चिघळला तर आण्विक महायुद्धाचा भडका उडू शकतो व या भडक्यातून ब्रिटनसारखे देशही वाचणार नाहीत’, असा थरकाप उडविणारा इशारा रशियाचे माजी लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल एव्हगेनी बुझिन्स्की यांनी दिला. बाल्टिक देश असलेल्या लिथुआनियाने रेल्वेमार्गे कॅलिनिनग्रॅडमध्ये पाठविण्यात येणाऱ्या उत्पादनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खवळलेल्या रशियाने लिथुआनियाला जबर किंमत मोजावी लागेल, असे बजावले आहे.

माजी लष्करी

कॅलिनिनग्रॅड हा रशियाचा बाल्टिक सागरी क्षेत्रातील तळ आहे. भौगोलिकदृष्ट्या हा तळ पोलंड व लिथुआनिया या दोन देशांच्या मध्ये आहे. रशियातून या भागात निर्यात होणाऱ्या गोष्टी लिथुआनियाच्या माध्यमातून पाठविण्यात येतात. बहुतांश ने-आण रेल्वेच्या माध्यमातून होते. मात्र काही दिवसांपूर्वी लिथुआनियाच्या रेल्वे प्रशासनाने एक निवेदन प्रसिद्ध करून कोळसा, धातू, सिमेंट व तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादने कॅलिनिनग्रॅडमध्ये पाठविता येणार नाहीत, असे जाहीर केले. युरोपिय महासंघाने लादलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे लिथुआनियाने म्हटले आहे.

मात्र रशियाने हा मुद्दा गांभीयाने घेतला असून लिथुआनियाचा निर्णय म्हणजे ‘ब्लॉकेड’चा भाग असल्याचा आरोप केला आहे. रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे महासचिव निकोलाय पत्रुशेव्ह यांनी तातडीने कॅलिनिनग्रॅडला भेट दिली असून स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली. ‘लिथुआनियाच्या हालचाली रशिया पाश्चिमात्यांवर विश्वास टाकू शकत नाही, याला दुजोरा देणाऱ्या ठरतात. रशियाविरोधातील कारवायांना सरकार योग्य प्रत्युत्तर देईल. लिथुआनियाच्या जनतेलाही याचे परिणाम भोगावे लागतील’, असे पत्रुशेव्ह यांनी बजावले. रशियाच्या माजी अधिकाऱ्यांनी अण्वस्त्रांच्या तैनातीचा केलेला उल्लेख व आण्विक महायुद्धाची धमकी यामुळे हा मुद्दा अधिकच चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत.

माजी लष्करी

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धात एका अमेरिकी जवानाचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. स्टीफन झॅबिल्स्की असे या जवानाचे नाव असून 15 मे रोजी युक्रेनमधील संघर्षात त्याचा बळी गेल्याचे परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. झॅबिल्स्की हा युक्रेन युद्धात बळी गेलेला दुसरा जवान ठरला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ‘मरिन कॉर्प्स’चा भाग असलेल्या विलि कॅन्सल युद्धात ठार झाला होता. याव्यतिरिक्त दोन अमेरिकी जवान डोनेत्स्क भागात पकडले गेले असून त्यांना कंत्राटी जवानांप्रमाणे वागणूक दिली जाईल, असे रशियाने बजावले आहे. अलेक्झांडर ड्य्रूक व अँडी हुयन अशी या जवानांची नावे असून त्यांना मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते, असे रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बजावले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info