ब्रिटनच्या संसदेत ब्रेक्झिटसाठी ‘३१ जानेवारी, २०२०’च्या मुदतीवर शिक्कामोर्तब करणारा प्रस्ताव मंजूर

ब्रिटनच्या संसदेत ब्रेक्झिटसाठी ‘३१ जानेवारी, २०२०’च्या मुदतीवर शिक्कामोर्तब करणारा प्रस्ताव मंजूर

लंडन – ब्रिटन ३१ जानेवारी २०२० रोजी युरोपिय महासंघाच्या बाहेर पडेल, यावर शिक्कामोर्तब करणारे विधेयक ब्रिटीश संसदेत बहुमताने मंजूर झाले आहे. शुक्रवारी ब्रिटनच्या संसदेत झालेल्या मतदानात ‘ब्रेक्झिट’साठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मांडलेल्या प्रस्तावाला ३५८ सदस्यांनी समर्थन दिले. प्रस्तावाच्या विरोधात २३४ मते पडली असून विरोधी ‘लेबर पार्टी’च्या काही सदस्यांनीही पंतप्रधान जॉन्सन यांच्या विधेयकाला समर्थन दिल्याचे उघड झाले आहे. ‘ब्रेक्झिट’चे कडवे समर्थक असलेल्या निगेल फॅराज यांनी, सदर प्रस्तावाला मिळालेली मान्यता हा ऐतिहासिक क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली.

 

गेल्याच आठवड्यात ब्रिटनमध्ये सर्वसाधारण निवडणूक पार पडली होती. त्यात ब्रिटीश संसदेतील ६५० जागांपैकी ३६४ जागा बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्त्वाखालील ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’ने जिंकल्या होत्या. तीन दशकांनंतर ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’ला संपूर्ण बहुमत देणारा निकाल हा पक्षासाठी ऐतिहासिक विजय ठरला होता. ‘गेट द ब्रेक्झिट डन’ हे घोषवाक्य ठेऊन ‘ब्रेक्झिट होणारच’ हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’ला यश मिळाले होते.

त्यामुळे निकालानंतर संसदेच्या पहिल्या सत्रात ‘ब्रेक्झिट’चा प्रस्ताव मंजूर करण्यास प्राधान्य मिळणार याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. त्यानुसार पंतप्रधान जॉन्सन यांनी ३१ जानेवारी, २०२० रोजी ब्रिटन युरोपिय महासंघातून पूर्णपणे बाहेर पडेल, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर जवळपास १२० हून अधिक मतांच्या फरकाने मिळालेला विजय पंतप्रधान जॉन्सन यांना अधिक बळ देणारा ठरल्याचे मानले जाते.

यापूर्वी ब्रिटनच्या माजी पंतप्रधान थेरेसा मे यांच्या कार्यकाळात ब्रिटनच्या संसदेने ‘ब्रेक्झिट’बाबतचे अनेक निर्णय उधळून लावले होते. त्यामागे ब्रिटनमधील राजकीय अस्थैर्य हा घटक कारणीभूत ठरला होता. मात्र जॉन्सन यांच्या नेतृत्त्वाखाली निर्विवाद बहुमत मिळाल्याने ‘ब्रेक्झिट’चा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. जॉन्सन यांनी प्रचारात तसेच निवडून आल्यानंतरही ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावरच भर दिला असून कोणत्याही स्थितीत ब्रिटन महासंघातून बाहेर पडेल, याची स्पष्ट ग्वाही दिली आहे.

ब्रिटन महासंघातून बाहेर पडण्याबाबत आपण तयार केलेला प्रस्ताव हा देशासाठी नवी पहाट आणणारा ठरेल, असा दावाही पंतप्रधान जॉन्सन यांनी केला. शुक्रवारी मंजूर झालेल्या विधेयकानंतर ब्रिटनच्या संसदेला काही काळाकरता सुट्टी असून नव्या वर्षात संसदेचे सत्र सुरू होईल. या सत्रात ‘ब्रेक्झिट डील’शी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा करून त्याला अंतिम रुप दिले जाईल, अशी माहिती ब्रिटनच्या सूत्रांनी दिली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info