‘इदलिब’मध्ये सिरियन लष्कराने तुर्कीच्या सुरक्षाचौकीला घेरले

‘इदलिब’मध्ये सिरियन लष्कराने तुर्कीच्या सुरक्षाचौकीला घेरले

बैरूत – उत्तरेकडील इदलिब प्रांतात मोठी लष्करी मोहीम छेडणार्‍या सिरियन लष्कराने ‘अलसुरमन’ येथील तुर्कीच्या सुरक्षाचौकीलाच वेढा घातला. सिरियन लष्कर ‘अलसुरमन’वर नियंत्रण मिळविण्यासाठी तुर्कीच्या सैनिकांवर हल्ले चढविल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, इदलिबमधील संघर्षावरुन रशिया आणि तुर्की यांच्यातही मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

गेल्या वर्षी झालेली संघर्षबंदी मोडून सिरियन लष्कराने उत्तरेकडील इदलिब प्रांतात आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सिरिया तसेच रशियाने इदलिबमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढविले असून बहुतांश भागाचा ताबा मिळविल्याचा दावा केला आहे. सोमवारी सिरियन लष्कराने इदलिबच्या आग्नेयकडील अलसुमरन आणि जरजानाझ या शहरांच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. यापैकी जरजानाझ शहरावर सिरियन लष्कराने ताबा घेतला. तर ‘अलसुमरन’ शहरात सिरियन लष्कराने मोठ्या प्रमाणात तैनाती केली आहे.

‘अलसुमरन’ शहरात तुर्कीने सुरक्षाचौकी उभारली आहे. गेल्या वर्षी रशिया आणि तुर्कीमध्ये झालेल्या करारानुसार, इदलिब प्रांतातील १२ ठिकाणी तुर्कीचे सैनिक तसेच तुर्कीसंलग्न बंडखोर तैनात आहेत. इदलिबमधील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी ही तैनाती असल्याचा दावा तुर्की करीत आहे. पण इदलिबमधील इंधनाच्या ताब्यासाठी तुर्कीने या प्रांतात तळ ठोकल्याचा आरोप सिरियाची अस्साद राजवट करीत आहे. यासाठीच तुर्कीने इदलिबमध्ये अस्सादविरोधी बंडखोरांना तैनात केल्याचा दावा सिरियन लष्कर करीत आहे. अशा परिस्थितीत, इदलिबमध्ये मोहीम छेडणार्‍या सिरियन लष्कराने ‘अलसुमरन’ येथील तुर्कीच्या सुरक्षाचौकीला घेराव टाकून इशारा दिल्याचे दिसत आहे.

सिरियन लष्कराने तुर्कीच्या सैनिकांविरोधात याआधीही अशा स्वरुपाच्या कारवाया केल्या होत्या. यावर्षी ऑगस्ट महिन्यातही सिरियन लष्कराने ‘मोरेक’ शहरातील तुर्कीच्या सुरक्षा चौकीला घेरले होते. यावेळी सिरियन लष्कराने तुर्कीच्या सैनिकांवर जोरदार हल्लेही चढविले होते. सिरियन लष्कराच्या कारवाईमुळे मोरेकमधील तुर्कीच्या सैनिकांचा कमांड सेंटर तसेच तुर्कीसंलग्न सिरियन बंडखोरांशी संपर्क तुटला होता. पुढे तुर्कीने रशियाशी वाटाघाटी करून ‘मोरेक’चा ताबा सिरियन लष्कराला सोपवून आपल्या सैनिकांना सोडविण्यात यश मिळविले होते.

पण ‘अलसुमरन’बाबत सिरिया तसेच रशिया तुर्कीबरोबर तडजोडीसाठी तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत. इदलिबमधून तुर्कीला पिटाळण्याबाबत सिरियन राजवट आणि कुर्दांमध्ये एकमत झाले आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली रशिया व तुर्कीची चर्चाही अपयशी ठरल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. सिरिया तसेच लिबियातील संघर्षाबाबत रशिया आणि तुर्कीमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाले आहेत. पुढच्या काळात याचे परिणाम समोर येऊ शकतील. सिरियाच्या इदलिबमध्ये याची सुरूवात झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info