सिरियातील हल्ल्यांत इराणचे आठ जवान ठार – इराणचे वायुसेनाप्रमुख थोडक्यात बचावले

बैरूत – सिरियातील हवाई तसेच लष्करीतळांवर झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आठ जण ठार झाले. हे सर्वजण सिरियातील इराणसंलग्न गटाचे जवान होते, असा दावा ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने केला. तर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या वायुसेनेचे प्रमुख ‘जनरल अमिर अली हाजीझादेह’ हे यापैकी एका हवाई हल्ल्यातून थोडक्यात बचावले, असा दावा इस्रायली वृत्तसंस्थेने केला आहे. दरम्यान, हे हवाई हल्ले इस्रायलनेच केल्याचा आरोप सिरियन माध्यमे करीत आहेत.

गेल्या पाच दिवसांमध्ये सिरियाच्या वेगवेगळ्या भागात भीषण हवाई हल्ले झाले आहेत. सिरियन माध्यमांनीच या हवाई हल्ल्यांच्या बातम्या प्रसिद्ध करून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हे हल्ले चढविल्याचे आरोप केले होते. तसेच या हल्ल्यात सिरियन लष्करी तळांचे तसेच इराणसंलग्न गटाचे मोठे नुकसान झाल्याचे सिरियन माध्यमांनी म्हटले आहे. पण सिरियातील अस्साद राजवट तसेच इस्रायली लष्कराने याला होकार किंवा नकार दिलेला नाही.

आता ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने याबाबत एक धक्कादायक माहिती उघड केली. रविवारी मध्यरात्री राजधानी दमास्कस येथील हवाईतळावरील हल्ल्यात तीन जण ठार झाले. दमास्कसच्या दक्षिणेकडील ‘अगरबा’ येथे ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’चा हवाईतळ आहे. इराणचे वायुसेनाप्रमुख जनरल हाजीझादेह या हवाईतळाच्या भेटीवर असताना हे हल्ले झाले व ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याचे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने मान्य केले.

तर बुधवारी रात्री इराक सीमेजवळच्या ‘बौकमाल’ येथील लष्करी तळावरील हल्ल्यात पाच जण ठार झाले. हे सारे इराणचे सैनिक होते, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला. पण सदर हवाई हल्ल्यात इराणसंलग्न सशस्त्र गटाचे जवान ठार झाल्याचे सिरियन मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे.

इराणबरोबरील मर्यादित संघर्ष टाळता येणार नाही – इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख

जेरूसलेम, दि. २७ (वृत्तसंस्था) – ‘युद्ध हा नेहमीच शेवटचा पर्याय मानला जातो. पण कधी कधी युद्ध हेच एखाद्या समस्येवरील उत्तर असते. त्यामुळे जेव्हा आपल्यावर युद्ध करण्याची वेळ ओढावेल, त्यावेळी इस्रायल पूर्ण तयारीनिशी उतरेल. इस्रयालचा इराणविरोधात मर्यादित संघर्ष
अटळ आहे’, असे इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल एवीव कोशावी म्हणाले.

इस्रायल नेहमीच शत्रूच्या एक पाऊल पुढे राहिला असून यापुढेही इस्रायलचे हेच धोरण असेल. त्याचबरोबर काहीही झाले तरी इस्रायल इराणला इराकमध्ये लष्करी तळ प्रस्थापित करू देणार नाही, असे लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी बजावले.

 

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info