मॉस्को – जगातील कोणत्याही भागात अवघ्या काही मिनिटांमध्ये हल्ला चढविण्याची क्षमता असणार्या ‘अॅवॅनगार्ड’ हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचे पथक रशियन लष्करात कार्यरत झाले आहे. रशियन लष्कराच्या ‘उरल माऊंटन्स’मधील तळावर ही क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आल्याची माहिती ‘स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्सेस’कडून देण्यात आली. रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनीही हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या कार्यरत होण्याची पुष्टी दिली असून ही रशियासाठी ऐतिहासिक घटना असल्याचे स्पष्ट केले.
दोन महिन्यांपूर्वी चीनने ‘डीएफ-झेडएफ’ हे हायरपसोनिक क्षेपणास्त्र संरक्षणदलात दाखल केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर हायपरसोनिक क्षेपणास्त्रे लष्करात तैनात करणारा रशिया हा जगातील दुसरा देश ठरला आहे. मात्र चीनच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या १० पट म्हणजे ‘मॅक १०’ इतका असून रशियाच्या ‘अॅवॅनगार्ड’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीपेक्षा २७ पट अर्थात ‘मॅक २७’ इतका जबरदस्त आहे.
या वेगामुळे जगात सध्या अस्तित्वात असलेली कोणतीही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा ‘अॅवॅनगार्ड’ व त्यासारख्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकत नाही, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले होते. ‘अॅवॅनगार्ड’ क्षेपणास्त्रात तब्बल दोन मेगाटन क्षमतेचे अण्वस्त्र किंवा आण्विक स्फोटके वाहून नेण्याचीही क्षमता आहे. ‘अॅवॅनगार्ड’ हे आंतरखंडीय हायपरसोनिक अण्वस्त्र असून जगाच्या कोणत्याही कोपर्यात हल्ला चढविण्यास सक्षम आहे, असा दावाही रशियाकडून करण्यात आला आहे.
गेल्या महिन्याच्या अखेरीस अमेरिकी लष्कराच्या निरीक्षकांनी आपल्या या क्षेपणास्त्राची पाहणी केल्याची माहितीही रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली होती. रशिया काही भविष्यकालीन व अतिप्रगत क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, लढाऊ विमाने, पाणबुड्यांची निर्मिती करीत?असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या वर्षी केली होती. यामध्ये आण्विक स्फोटके वाहून नेणारे आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘अॅवॅनगार्ड’चा समावेश होता.
‘अॅवॅनगार्ड’व्यतिरिक्त रशियाने ‘झिरकॉन’, ‘किन्झाल’ व ‘केएच-९०’ अशी हायपरसोनिक क्षेपणास्त्रे विकसित केली असून त्यांचा वेग ‘मॅक ५’ ते ‘मॅक १२’पर्यंत असल्याचे सांगण्यात येते. यातील ‘झिरकॉन’ हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र खास नौदलासाठी विकसित करण्यात आले असून २०२० सालच्या अखेरपर्यंत तैनात करण्यात येईल, अशी माहिती रशियन सूत्रांनी दिली.
रशियाकडून हायपरसोनिक क्षेपणास्त्रे अभेद्य असल्याचा इशारा देण्यात आला असला तरी अमेरिकेने ‘सुपर लेझर्स’ अशा क्षेपणास्त्रांना भेदू शकतील, असा दावा केला आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या ‘रेथॉन’ कंपनीने आपण ‘सुपर लेझर सिस्टिम’ विकसित केल्याचेही म्हटले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |