आपल्या जनतेची टेहळणी करणार्‍या चीनच्या राजवटीला प्रगत तंत्रज्ञान देऊन बळकट करु नका

आपल्या जनतेची टेहळणी करणार्‍या चीनच्या राजवटीला प्रगत तंत्रज्ञान देऊन बळकट करु नका

वॉशिंग्टन/बीजिंग, दि. १६ (वृत्तसंस्था) – अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी चीनसारख्या ‘ऑर्वेलियन सर्व्हिलन्स स्टेट’ला बळकट करणारे तंत्रज्ञान पुरवू नये आणि अमेरिकी मूल्यांचा बळी देऊ नये, असा खरमरीत इशारा परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला. अमेरिका व चीन दोन देशांमध्ये सुरू असणारे व्यापारयुद्ध रोखणार्‍या करारावर स्वाक्षर्‍या करीत असतानाच पॉम्पिओ यांनी हा इशारा देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी काही महिन्यांपूर्वी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीला लक्ष्य करणारी घणाघाती टीका केली होती. हे टीकास्त्र सोडतानाच अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी पुढील काही महिन्यात, कम्युनिस्ट पार्टीची धोरणे व या पक्षाकडून चीनमधील यंत्रणांचा सुरू असलेला वापर यांची माहिती उघड करण्याचे संकेत दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून पॉम्पिओ यांनी अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्राचे ‘हब’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘सिलिकॉन व्हॅली’तील कंपन्यांसमोर आपली भूमिका मांडली.

तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसमोर चीनच्या सत्ताधारी राजवटीचा पर्दाफाश करताना परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी ‘ऑर्वेलियन सर्व्हिलन्स स्टेट’चा केलेला उल्लेख महत्त्वाचा ठरतो. हा उल्लेख जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ कादंबरीशी जोडलेला आहे. प्रसिद्ध ब्रिटीश साहित्यिक जॉर्ज ऑर्वेल यांची ‘१९८४’ ही कादंबरी १९४९ साली प्रकाशित झाली होती. या कादंबरीत १९८४ साली घडणारे एक कथानक मांडण्यात आले होते.

जगातील बहुसंख्य जनतेला सतत युद्धाला सामोरे जावे लागत असून एकतंत्री हकुमशाही राजवटीने खोट्या माहितीचा प्रचार व सामूहिक टेहळणीच्या माध्यमातून जनतेवर नियंत्रण ठेवले आहे, असे या कादंबरीचे कथासूत्र होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘क्लासिक’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘१९८४’ या कादंबरीतील ‘बिग ब्रदर’, ‘२+२=५’ यासारख्या संकल्पना जगभरात प्रसिद्ध झाल्या होत्या.

अमेरिकी कंपन्यांनी चीनच्या बाहेर पडावे, अशी ट्रम्प प्रशासनाची इच्छा नाही, असे पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले. उलट अमेरिकी कंपन्यांनी समान स्तरावर स्पर्धा करून चीनमध्ये आपला व्यवसाय अधिक वाढवावा आणि अमेरिकेत रोजगारनिर्मिती करावी, हेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे धोरण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र हे करताना अमेरिकेचा प्रतिस्पर्धी असणारा चीन बळकट होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी, असे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी बजावले.

‘अमेरिकी कंपन्यांनी प्रतिस्पर्धी देशाचे लष्कर किंवा त्यातील सत्ताधारी राजवटीची देशावरील एकतंत्री दडपशाही मजबूत होईल, अशा प्रकारचे करार करु नयेत. फायद्यासाठी अमेरिकी मूल्यांचा बळी जाणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी’, अशा शब्दात पॉम्पिओ यांनी अमेरिकी कंपन्यांना सुनावले. चीनमध्ये असलेल्या कायद्यांची आठवण करून देत अमेरिकी कंपन्यांनी चीनमध्ये व्यवहार करताना अमेरिकेच्या सुरक्षेला धक्का बसणार नाही, याची जाणीव ठेवावी, असेही पॉम्पिओ यांनी सांगितले.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info