राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून ‘डील ऑफ सेंच्युरी’ची घोषणा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून ‘डील ऑफ सेंच्युरी’ची घोषणा

•अखंड जेरूसलेम इस्रायलची राजधानी

•पॅलेस्टाईनला दुप्पट भूमी देण्याची तयारी

•पॅलेस्टिनींसाठी ५० अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव

वॉशिंग्टन – इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा प्रश्‍न सोडविण्याची ही अखेरची संधी असल्याचे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले ‘डील ऑफ द सेंच्युरी’ घोषित केले. यानुसार संपूर्ण ‘जेरूसलेम’ ही इस्रायलची राजधानी असेल. त्याचवेळी पॅलेस्टाईनचे सध्याचे क्षेत्रफळ दुपटीने वाढविले जाणार असून ईस्ट जेरूसलेममध्ये पॅलेस्टाईनच्या राजधानीची जागा असेल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. हा तोडगा मान्य केला तर पॅलेस्टाईनमध्ये अमेरिका तब्बल ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करील, असा प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या उपस्थितीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपला आराखडा मांडला. सुमारे ५० पानांच्या या आराखड्यातील महत्त्वाची माहिती ट्रम्प यांनी उघड केली. यानुसार अखंड जेरूसलेम इस्रायलची राजधानी असेल असे सांगून ट्रम्प यांनी या ‘अखंड’ शब्दावर विशेष भर दिला. तर सध्या पॅलेस्टाईनकडे असलेल्या क्षेत्रफळापेक्षा दुप्पट जागा देऊन ईस्ट जेरूसलेमच्या काही भागात पॅलेस्टाईनला राजधानी उभारता येईल, असा प्रस्ताव अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला.

पॅलेस्टिनी जनता ईस्ट जेरूसलेममधील आपल्या श्रद्धास्थानाला कधीही भेट देऊ शकते, असे सांगून ट्रम्प यांनी यासाठी इस्रायल वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली. तसेच पॅलेस्टाईनच्या भागात इस्रायलने सुरू केलेल्या ज्यूधर्मियांच्या वस्त्यांचे काम चार वर्षांसाठी स्थगित करण्याची घोषणा या प्रस्तावात करण्यात आली आहे. आपला हा प्रस्ताव स्वीकारून पॅलेस्टाईनने दहशतवादाचा मार्ग सोडला, तर पॅलेस्टाईनमध्ये अमेरिका सुमारे ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करील, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले. यामुळे पॅलेस्टाईनला कुणाच्या देणग्यांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहणार नाही, असे ट्रम्प पुढे म्हणाले.

       

इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ही अखेरची संधी असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. आपल्या या योजनेमुळे एकाही इस्रायली किंवा पॅलेस्टिनीला आपली जागा सोडावी लागणार नाही, असे सांगून दोन्ही बाजूंसाठी हा विजयच ठरतो, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. पॅलेस्टाईनबरोबर शांततेसाठी इस्रायलने फार मोठे पाऊल उचलले आहे, असा दावा करून ट्रम्प यांनी यासाठी इस्रायलची प्रशंसा केली. विशेषतः इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी पॅलेस्टिनींसाठी मोठे औदार्य दाखविल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

जेरूसलेम ही इस्रायलची राजधानी असल्याचे अमेरिकेने आधीच मान्य केले होते. त्यामुळे जेरूसलेमवरील इस्रायलचा अधिकार तडजोड न करता येण्याजोगा असल्याचे ट्रम्प यांंनी याआधीच स्पष्ट केले होते. जगभरातून होत असलेल्या विरोधाची पर्वा न करता ट्रम्प यांनी हा निर्णय?घेतला होता. पण आता आपल्याला पॅलेस्टिनींसाठी काहीतरी करायचे असल्याचे सांगून ट्रम्प यांनी हा प्रस्ताव दिला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info