तुर्कीबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर – फ्रान्सकडून ग्रीसच्या सहाय्यासाठी युद्धनौका रवाना

तुर्कीबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर – फ्रान्सकडून ग्रीसच्या सहाय्यासाठी युद्धनौका रवाना

पॅरिस/अंकारा – तुर्की आपल्या आक्रमक हालचालींनी या क्षेत्रातील तणाव विकोपाला नेत असल्याचा आरोप फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केला. तुर्कीच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी ग्रीस व सायप्रसबरोबर संयुक्त युद्धसरावाची घोषणा केली. त्याचबरोबर फ्रान्सने ग्रीससाठी आपल्या युद्धनौका रवाना केल्या आहेत. क्रेटे बेटाच्या हद्दीत हा युद्धसराव पार पडणार आहे. पण युद्धनौका रवाना करून फ्रान्स भूमध्य समुद्रातील तणावासाठी कारणीभूत?ठरत असल्याचा प्रत्यारोप तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केला.

ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोताकिस यांनी दोन दिवसांपूर्वी फ्रान्सचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेतली. या भेटीत फ्रान्स आणि ग्रीसमध्ये सहकार्य करार पार पडले. तसेच भूमध्य क्षेत्रातील घडामोडींवरही चर्चा झाली. या चर्चेनंतर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ग्रीसच्या सहाय्यासाठी आपल्या युद्धनौका रवाना करण्याचे जाहीर केले. फ्रान्सची ‘डिक्सम्यूड’ ही विनाशिका या युद्धसरावात सहभागी होणार आहे. हा युद्धसराव सागरी तसेच क्रेटे बेटांच्या किनारपट्टीवर पार पडणार आहे.

‘ग्रीसबरोबरचे सामरिक सहकार्य वाढविण्यासाठी हा युद्धसराव आयोजित करण्यात आला असून या क्षेत्रातील इतरही देशांनी सदर युद्धसरावात सहभागी व्हावे’, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केले. तसेच तुर्कीने लिबियाबरोबर भूमध्य समुद्रातील क्षेत्रासंबंधी झालेला करार आणि लिबियातील संघर्षातील तुर्कीचा हस्तक्षेप यावर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी टीका केली. ‘ग्रीस आणि सायप्रस यांच्या सार्वभौमत्वाच्या अधिकारांना फ्रान्सचा पाठिंबा असून याला आव्हान देणार्‍या तुर्कीचा फ्रान्स निषेध करतो. त्याचबरोबर तुर्की आणि लिबियात झालेल्या कराराशीही फ्रान्स सहमत नाही’, असे मॅक्रॉन म्हणाले.

   

ग्रीसचे पंतप्रधान मित्सोताकिस यांनीही फ्रान्सच्या सहकार्याचे स्वागत केले. युद्धनौकांची ही तैनाती ग्रीसच्या सुरक्षेची हमी देणारे ठरेल, असा दावा पंतप्रधान किरियाकोस मित्सोताकिस यांनी केला. येत्या काही तासात फ्रान्स, ग्रीस आणि सायप्रस यांच्यात हा युद्धसराव सुरू होईल. भूमध्य समुद्रातील क्रेटे बेटांच्या दक्षिणेकडील क्षेत्रात या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या ग्रीस आणि अमेरिकेच्या युद्धनौकांमध्ये ‘अलेक्झांडर द ग्रेट -२०२०’ हा युद्धसराव सुरू आहे.

दरम्यान, काही तासांपूर्वी ‘लिबिया’च्या मुद्यावरून फ्रान्स-तुर्कीतील मतभेद तीव्र झाले होते. तुर्कीच्या जहाजांमधून सिरियन कंत्राटी सैनिक लिबियात दाखल होत असल्याचा आरोप फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केला होता. मॅक्रॉन यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना तुर्कीने लिबियातील समस्येसाठी फ्रान्सच जबाबदार असल्याची टीका केली होती. तर त्याआधी सिरियातील कुर्दांच्या मुद्यावरून दोन देशांमधील तणाव टोकाला गेल्याचे समोर आले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info