अबूजा – ‘नायजेरियाच्या मूळ भूप्रदेशावर फुलानी जनतेचा हक्क असून तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. हजारो वर्षांपूर्वी फुलानी समुदायाकडे या सार्या भूप्रदेशाचा ताबा होता. पण हा इतिहास पुसून टाकण्यात आला. मात्र आता इतिहास पुन्हा लिहिण्याची वेळ आली आहे. सोकोटोपासून ते अटलांटिक महासागरापर्यंत, आपल्या धर्मशत्रूंच्या नियंत्रणाखाली असलेल्या सार्या भूभागावर फुलानी पुन्हा ताबा मिळवतील’, असा इशारा या दहशतवादी संघटनेचा अध्यक्ष ‘बादू सलिसू अहमदू’ याने दिला. दर दहा दिवसांनी भीषण दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जाणार्या नायजेरियाच्या सुरक्षा यंत्रणांनी फुलानी गटाची ही धमकी गांभीर्याने घेतली आहे.
नायजेरियात वांशिक हल्ल्यांसाठी ओळखल्या जाणार्या ‘फुलानी’ या दहशतवादी संघटनेने दोन दिवसांपूर्वी एक पत्रक प्रसिद्ध केले. गेल्या आठवड्यात ‘प्लॅटेऊ’ प्रांतात फुलानी दहशतवाद्यांनी बिरोम वंशाच्या नागरिकांवर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात ‘फुलानी’च्या दहशतवाद्यांनी १४ जणांचा बळी घेतला होता. बिरोम नागरिकांवरील या हल्ल्याचे ‘फुलानी’ प्रमुख अहमदू याने समर्थन केले. तसेच फुलानी गटाच्या जवानावर एक हल्ला चढविला तर तिप्पटीने प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा अहमदू याने दिला.
त्याचबरोबर, फुलानीचा प्रमुख अहमदू याने नायजेरियातील सरकारबरोबरच आफ्रिकेतील इतर देशांना देखील धमकावले. ‘हजारो वर्षांपूर्वी फुलानी वंशाचे नागरिक प्लॅटेऊ-बेनू भागात सर्वात आधी स्थायिक झाले होते. त्यामुळे येथील भूप्रदेशाच्या प्रत्येक इंचावर आमचाच अधिकार आहे. हा इतिहास नष्ट करून चुकीच्या गोष्टी मांडण्यात आल्या. पण यापुढे हा चुकीचा इतिहास पुसून नवा इतिहास लिहिला जाईल’, असे अहमदू म्हणाला.
त्याचबरोबर प्लॅटेऊ प्रांतातील ‘सोकोटो’ शहरापासून अटलांटिक महासागराच्या किनारपट्टीपर्यंतचा प्रत्येक भूभागावर फुलानी ताबा मिळवतील, असे या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाने धमकावले. या संघर्षासाठी फुलानीचे जवान तसेच प्रत्येक कट्टरपंथी तयार असल्याचा दावा अहमदू याने केला. याबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचेही अहमदू याने स्पष्ट केले.
पण दहशतवादी नेता अहमदू चुकीच्या माहितीद्वारे कट्टरपंथियांना चिथावणी देत असल्याचा दावा नायजेरियन सरकार व नेते करीत आहेत. १८ व्या शतकाच्या काळात फुलानी वंशाचे नागरिक नायजेरियाच्या प्लॅटेऊ भागात दाखल झाले होते. त्यामुळे फुलानी दहशतवादी संघटना नायजेरियावर आपला हक्क सांगू शकत नसल्याचे या देशाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, नायजेरियामध्ये अल कायदा तसेच बोको हराम आणि अल-शबाब या दहशतवादी संघटना सक्रीय असून फुलानी गटाचादेखील स्वतंत्र प्रभाव आहे. या दहशतवादी गटाकडून नायजेरियातील ख्रिस्तधर्मियांना लक्ष्य केले जाते. दोन वर्षांपूर्वी फुलानी दहशतवाद्यांनी ख्रिस्तधर्मियांवर मोठा हल्ला चढविला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |