वॉशिंग्टन – ‘सध्या चीनमधून सुरू झालेली साथ रोखण्यासाठी आक्रमक मोहीम सुरू आहे. मात्र या विषाणूबद्दल अद्यापही फारशी माहिती नाही. ही साथ पुढील काही महिनेच नाही तर कदाचित पुढच्या वर्षापर्यंतही कायम राहू शकते. पुढील काळात विषाणूचा संसर्ग मानवी शरीरातूनही होण्यास सुरुवात होईल’, असा गंभीर इशारा अमेरिकेचे आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी डॉक्टर रॉबर्ट रेडफिल्ड यांनी केला. डॉक्टर रेडफिल्ड अमेरिकेतील ‘सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेंशन’ या यंत्रणेचे प्रमुख आहेत.
चीनमधून सुरू झालेली ‘कोव्हिड-१९’ रोगाची साथ जगातील २५हून अधिक देशांमध्ये पसरली असून त्यात अमेरिका, युरोप, आफ्रिका व आशिया खंडाचा समावेश आहे. या देशांमध्ये ‘कोव्हिड-१९’च्या साथीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६४ हजार ४५२ झाली असून बळींची संख्या एक हजार ३८३वर गेली आहे. चीनव्यतिरिक्त इतर देशांमधील रुग्णांची संख्या ६०० वर जाऊन पोहोचली असून त्यात जपानमधील २५४ जणांचा समावेश आहे.
अमेरिकेतही रुग्णांच्या संख्येत भर पडत असून शुक्रवारपर्यंत देशात १५ रुग्णांची नोंद झाल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी चीनमधून विमानाने आणलेल्या अनेक नागरिकांना विशेष वैद्यकीय तपासणीसाठी वेगळे ठेवण्यात आले आहे. चीनव्यतिरिक्त इतर देशांमधील वाढते रुग्ण चिंतेची बाब ठरली असून जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक संस्था व तज्ज्ञांनी त्याबाबत इशारे दिले आहेत. अमेरिकेच्या प्रमुख अधिकार्यांनी दिलेला इशाराही त्याचाच भाग मानला जातो.
आरोग्य अधिकार्यांकडून साथीची व्याप्ती दीर्घकाळ लांबण्याचा इशारा दिला जात असतानाच ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ सल्लागारांनी चीन सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनी चीनने ‘कोव्हिड-१९’साथीची हाताळणी योग्य प्रकारे न केल्याचा ठपका ठेवला आहे. चीनकडून पारदर्शकतेची अपेक्षा होती, मात्र चीन सरकारने ती पाळल्याचे दिसत नाही, असे कुडलो यांनी म्हटले आहे.
दरम्यान, चीनमधील साथीत ‘कोव्हिड-१९’ची लागण होणार्यांमध्ये आरोग्य कर्मचार्यांचाही समावेश असून जवळपास एक हजार ७०० कर्मचार्यांना त्याची लागण झाल्याची माहिती चीनच्या यंत्रणांनी दिली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |